मुंबई (Mumbai) : मुलुंड येथे पक्षी उद्यानाच्या उभारणीसंदर्भात मुंबई महापालिकेने केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणास (सीझेडए) तपशीलवार आराखडा सादर केला असून या उद्यानात १८ दुर्मीळ प्रजातींसह २०६ प्रजातींचे पक्षी असणार आहेत. यासंदर्भात केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडे पाठपुरावा सुरु असून लवकरच या पक्षी उद्यानाच्या कामाला सुरुवात होणार आहे.
महापालिकेच्या योजनेनुसार मुलुंड पक्षी उद्यान हे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालय (भायखळा) प्राणी संग्रहालयाचे उपकेंद्र असणार आहे. मुलुंड (पश्चिम) येथील भूखंड क्रमांक ७०६ ब/ड आणि ७१२/अ वरती हे पक्षी उद्यान उभारण्यात येणार असून याचे क्षेत्रफळ १७ हजार ९५८ चौरस मीटर आहे. पक्षीगृहासाठी १० हजार ८५९ चौरस मीटर आणि खेळांसाठी ३ हजार ७२८ चौरस मीटर क्षेत्र या उद्यानात राखीव असणार आहे. या पक्षी उद्यानात आशियाई, आफ्रिकी, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका अशी पक्षांची क्षेत्रवार विभागणी असणार आहे. प्रत्येक पक्ष्यांच्या प्रजातींचे निवासस्थान उभारण्यात येणार आहे. रेड ब्रेस्टेड पॅराकीट, ब्लॉसम हेडेड पॅराकीट, व्हाईट पीकॉक, मलबार ग्रे हॉर्नबिल, ब्लॅक हंस, ब्लॅक मुनिया, कोकाटू गालाह, ओस्ट्रिचेस, स्कॉलेट, स्कॉलेट, स्कॉलेट या काळाच्या ओघात लुप्त होत चाललेल्या झालेल्या दुर्मिळ १८ प्रजातींचे २०६ पक्षी येथे पाहता येणार आहेत.
केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडे मुलुंड पक्षी उद्यानासंदर्भात सातत्याने पाठपुरावा करणारे स्थानिक आमदार मिहीर कोटेचा म्हणाले की, पक्षी उद्यानात नैसर्गिक निवारे असतील. पक्ष्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासांप्रमाणेच या उद्यानात वाढण्यास त्यामुळे मदत होणार आहे. 110 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या भायखळा प्राणिसंग्रहालयानंतर मुलुंडमधील बर्ड पार्क हे मुंबई आणि एमएमआर क्षेत्रातील सर्वात मोठे पर्यटकांचे आकर्षण असेल. मुंबईच्या उपनगर भागात आणि एमएमआर प्रदेशात राहणाऱ्या नागरिकांना कमी प्रवासाच्या अंतरात या पक्षी उद्यानाला भेट द्यायला नक्कीच आवडेल. पक्षीप्रेमींसाठी ही एक पर्वणी असेल. त्याचबरोबर कुटुंब, नातेवाईक, शाळकरी मुले-मुली आणि नागरिकांना मुलुंड पक्षी उद्यानात अनोखा अनुभव मिळेल, असा विश्वास कोटेचा यांनी व्यक्त केला. पक्षीगृहात प्रवेश करण्यापूर्वी मोठ्या धबधब्यासह येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करण्याची योजना आहे. तसेच पक्ष्यांना येथे खुले प्लाझादेखील असणार आहेत. या पक्षी उद्यानात संवादात्मक कार्यक्रम, कार्यशाळा आणि पक्षी तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित केली जातील, असेही कोटेचा यांनी सांगितले.