मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेकडून (Mumbai Municipal Corporation) दरवर्षी रस्ते (Road) दुरुस्तीसाठी शेकडो कोटी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र, तरीही रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या कमी होत नाही. महापालिकेने पश्चिम उपनगरात गेल्या दहा वर्षात 999 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दुरुस्ती केली आहे. त्यात, 789 किलोमीटरचे डांबरी रस्ते असून 209 किलोमीटरचे सिमेंट काँक्रिटचे रस्ते आहेत. दहा वर्षात तब्बल 4 हजार 934 कोटी रुपयांचा खर्च केला आहे. विशेष म्हणजे, सिमेंटच्या रस्त्यांच्या प्रत्येक किलोमीटरच्या दुरुस्तीवर चक्क 13 कोटी 47 लाख रुपयांचा खर्च केला आहे.
प्रत्येक किलोमीटरच्या रस्त्यासाठी महानगर पालिका कोट्यवधी रुपयांचा खर्च करत आहे. मात्र, त्याचे चांगले परिणाम दिसत नाही. पुन्हा दरवर्षी खड्डे दुरुस्तीसाठी महानगर पालिकेला खर्च करावा लागतो. माहितीच्या अधिकारातून ही माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
2010-11 ते 2020-21 या कालावधीत महापालिकेने डांबरी रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 2 हजार 106 कोटी 76 लाख रुपयांचा खर्च केला आहे. तर, कॉंक्रिटच्या रस्त्यांच्या दुरुस्तीवर 2 हजार 828 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे, अशी माहिती प्रशासनाकडून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. महापालिकेने डांबरी रस्त्यांच्या प्रत्येक किलोमीटरच्या दुरुस्तीसाठी 2 कोटी 66 लाख रुपये आणि सिमेंटच्या रस्त्यांच्या प्रत्येक किलोमीटरच्या दुरुस्तीसाठी 13 कोटी 47 लाख रुपयांप्रमाणे खर्च केला आहे. पश्चिम उपनगरातील रस्ते दुरुस्तीवर महापालिकेने गेल्या दहा वर्षात तब्बल 4 हजार 934 कोटी रुपयांचा खर्च केला आहे.
महापालिकेची निवडणूक 2017 मध्ये झाली आहे. त्यापूर्वीच्या 2015-16 या वर्षात तब्बल 508 किलोमीटर लांबीच्या सिमेंट कॉंक्रिटच्या रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. तर, दहा वर्षात 789 किलोमीटरच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली. 508 किलोमीटरच्या रस्त्यांची दुरुस्ती वर्षात होणे शक्य नाही. त्यामुळे पुढील वर्षातील रस्ते दुरुस्तीची कामेही त्याच वर्षी मंजूर करण्यात आली आहेत. तर, याच वर्षात 34 किलोमीटरच्या सिमेंट कॉंक्रिटच्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात आले आहे.
महापालिकेच्या पश्चिम उपनगर विभागामार्फत रस्ते दुरुस्तीबाबत माहिती उपलब्ध करुन देण्यात आली. मात्र, पूर्व उपनगर विभागाकडे आवश्यक मनुष्यबळ नसल्याची सबब पुढे करण्यात आली आहे. माहिती अधिकारात विचारलेली माहिती विस्तृत असल्याने ती माहिती संकलित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागणार आहे. सदर मनुष्यबळ या कार्यालयात उपलब्ध नसल्याने ही माहिती पुरवता येत नाही, असे उत्तर पालिकेच्या कार्यकारी अभियंता (रस्ते )पूर्व उपनगर मार्फत देण्यात आली आहे.
अडीच किलोमीटरसाठी 27 कोटी
देवनार डंपिंगमध्ये अडीच किलोमीटरचा डांबरी रस्ता तयार करण्याबरोबरच आरसीसी पर्जन्यवाहिनी बांधण्यासाठी महापालिका तब्बल 27 कोटी 9 लाख रुपयांचा खर्च करणार आहे. 1 मीटर रुंद आणि 1 मीटर उंचीचा हा रस्ता आहे. डंपिंगच्या मानवी वस्तीच्या बाजूला असलेल्या भागात हा रस्ता बांधण्यात येणार आहे. यामुळे परिसरात गस्त घालणे सोपे होईल. तसेच, आपत्कालीन स्थितीत वाहनेही इच्छित स्थळी नेता येतील. सर्वेक्षण व देखरेख समितीच्या शिफारशीनुसार महापालिकेने हे काम हाती घेतले आहे.