मुंबई (Mumbai) : मुंबईतील मरीन ड्राइव्ह, फ्लोरा फाऊंटन आणि एशियाटिक लायब्ररी परिसराचा विकास तसेच सुशोभीकरण करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. हेरिटेज विकास करण्यासाठी महापालिकेने व्यवस्थापन सल्लागार संस्था आणि प्रकल्प सल्लागारांच्या नेमणुकीसाठी प्रस्ताव मागवले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मरीन ड्राईव्ह परिसराचा काही महिन्यांपूर्वी दौरा केला होता. त्यावेळी नागरी सुविधा, पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि सुशोभीकरणाच्या कामाचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समुद्राच्या दिशेकडील इमारतींना विशिष्ट प्रकारची रंगरंगोटी करावी. प्रसाधनगृहे, स्वच्छतेची काळजी घेत आंतरराष्ट्रीय दर्जाचा लेझर शो सुरू करण्याच्या सूचना बीएमसीला केल्या होत्या. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतर मरीन ड्राईव्ह परिसराचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेकडून घेण्यात आला आहे.
महापालिकेकडून मरीन ड्राईव्ह परिसरात सी साईड प्लाझा या नव्या पर्यटनस्थळाचे निर्माण करण्यात येणार आहे. ५३ मीटर लांब आणि ५ मीटर रुंद अशा जागेत व्ह्युविंग डेकची निर्मिती केली जाणार आहे. नागरिकांना समुद्र पाहण्यासाठी आणि चालण्यासाठी जेट्टीच्या ठिकाणी तयार करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. मरीन ड्राईव्ह परिसराचा विकास झाल्यास मुंबईत येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.