मुंबई (Mumbai) : पहिल्या टप्प्यात २१२ आणि दुसऱ्या टप्प्यात २९५ अशाप्रकारे सुमारे १३५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिट कामांना मंजुरी मिळाल्यामुळे मुंबई शहर भागांतील रस्त्यांच्या कामांना येत्या १ ऑक्टोबरपासून सुरुवात अपेक्षित आहे. या दोन्ही टप्प्यातील कामांवर सुमारे साडेतीन हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. एक किलोमीटर सिमेंट रस्त्याच्या कामावर सरासरी १९ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च होणार आहे. एनसीसी लिमिटेड आणि जीएचव्ही (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्या अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील कामे करणार आहेत.
मुंबईतील सर्व रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी सिमेंट काँक्रिटचे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत सुमारे २०५० कि.मी.लांबीचे रस्ते हे महानगरपालिकेच्या अखत्यारीत येत असून त्यातील सुमारे ५४० कि.मी. रस्ते हे केवळ शहर भागांत आहेत. या शहर भागांतील सुमारे २५५ कि.मी. रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आल्याचा दावा महापालिका रस्ते विभागाकडून केला जात आहे. त्यामुळे आता ५३ टक्के रस्ते हे डांबरी तथा पेव्हरब्लॉकचे शिल्लक आहेत. त्यानुसार शहर भागांतील उर्वरीत रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात ७१.९१ कि. मी. लांबीच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यासाठी टेंडर मागवून कंत्राटदाराची निवड करण्यात आली होती.
परंतु, नेमणूक झालेले कंत्राटदार मे. रोडवे सोल्युशन्स इंडिया इन्फ्रा लिमिटेड या कंपनीने कंत्राट टेंडरमधील अटी व शर्तीची पूर्तता न केल्याने तसेच काम सुरु करण्यास अक्षम्य दिरंगाई केल्याने ९ नोव्हेंबर २०२३ रोजी हे कंत्राट रद्द करण्यात आले. तसेच त्यांना या प्रकरणी ६४ कोटींचा दंड आकारण्यात आला. या टेंडरमधील २१२ रस्त्यांपैकी डी विभागातील ३ रस्ते व सी विभागातील १ रस्ता असे मिळून एकूण ४ रस्त्यांचे काम करण्यात आले. त्यामुळे उर्वरीत २०८ रस्त्यांची सुधारणा व मजबुतीकरण करण्यासह २७ रस्त्यांवरील जुन्या तुटलेल्या पॅनल्सची दुरुस्ती आदींचे काम करण्यासाठी टप्पा एक अंतर्गत नव्याने टेंडर मागवण्यात आले आहे. यामध्ये एनसीसी लिमिटेड ही कंपनी पात्र ठरली आहे, या कंपनीने महापालिकेच्या अंदाजपत्रकानुसार ९.९० टक्के अधिक दर आकारले होते, त्यानंतर वाटाघाटीमध्ये या कंपनीने दर कमी करत ४ टक्के अधिक दर देण्याची तयारी दर्शवल्याने अखेर या दरात महापालिकेने हे टेंडर मंजूर केले. त्यामुळे शहर भागातील टप्पा एक अंतर्गत रस्ते विकासकामांसाठी १९३८ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. तर टप्पा दोन अंतर्गत शहर भागांतील ६५.०६ कि.मी लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी टेंडर मागवण्यात आले आहे. या दुसऱ्या टप्प्यात २९५ रस्त्यांचा विकास केला जाणार आहे. या रस्ते कामांसाठी जीएचव्ही (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड (GHV (India) Private Limited) ही संयुक्त भागीदारीतील कंपनी पात्र ठरली आहे. या रस्ते कामांमध्येही कंत्राटदाराने महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा ९.०१ टक्के अधिक बोली लावली होती, परंतु या कंपनीने वाटाघाटीनंतर पाच टक्के दर कमी करून ४ टक्के अधिक दराने काम करण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे या रस्ते विकासासाठी १६२४.६८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.