मुंबई (Mumbai) : महापालिकेच्या निवडणूक वर्षामुळे तसेच त्यानंतर दीड दोन वर्षात येणाऱ्या विधानभा निवडणुकांमुळे पुढील काही वर्षे मुंबईतील रस्ते दुरुस्ती वेगाने सुरु राहण्याची शक्यता आहे. येत्या वर्षाच्या अर्थसंकल्पात रस्ते दुरुस्तीसाठी 2 हजार 200 कोटी आणि पुल दुरुस्तीसाठी दीड हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेतील सत्ता कायम ठेवण्याचे आव्हान शिवसेनेपुढे आहे. मात्र, दरवर्षी होणाऱ्या रस्त्यांच्या दुरावस्थेची नाराजी मतदानाच्या वेळी उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने चालू अर्थिक वर्षात तब्बल 2 हजार 200 कोटी रुपयांची रस्ते दुुस्तीची कामे मंजूर केली आहेत. तर, या कामांची मोठी रक्कम पुढच्या वर्षी अदा केली जाणार आहे.
शिवसेना आता राज्यातही सत्तेत आहेत. त्यातच मुंबईत 36 विधानसभा मतदार संघ असून शिवसेनेचे 14 आमदार आहेत. विधानसभा निवडणुकही 2024 मध्ये होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीतही रस्त्यांवरुन अडचण होऊ नये म्हणून येत्या दोन वर्षात मुंबईतील रस्ते दुरुस्ती सुसाट राहणार असल्याचे चित्र आहे.
रस्ते दुरुस्ती बरोबरच पुलांच्या अपघातात जिवितहानी होऊ लागल्याने महानगर पालिकेने या वर्षात मोठ्या प्रमाणात पूल दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. त्यासाठी आगामी वर्षात 1 हजार 300 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
कॉंक्रिटीकरणावर भर
येत्या वर्षात 219 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे नियोजन करण्यात आले आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या कमी व्हावी म्हणून कॉंक्रिटीकरणावर भर देण्यात येत आहे, असे महापालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले. आगामी वर्षात 206 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्यात येईल. सध्या 21 पूल पाडून नवे पूल बांधण्यात येत आहेत. त्याच बरोबर 47 पूलांच्या मोठ्या प्रमाणात आणि 144 पूलांच्या किरकोळ दुरुस्ती करण्यात येणार आहेत.
निधीत वाढ
रस्ते दुरुस्तीसाठी चालू वर्षात 1600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. मात्र, निवडणुकीमुळे कामे वाढल्याने 300 कोटी रुपयांची वाढीव तरतूद करण्यात आली. तर, पूल दुरुस्तीसाठी चालू वर्षात 961 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. ती तरतूद आता 1 हजार 119 कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.