मुंबई (Mumbai) : मुंबईतील रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचे काम आणखी रखडण्याची चिन्हे आहेत. मुंबईतील रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणासाठी डिसेंबर महिन्यात प्रसिद्ध केलेले १३६२ कोटींचे टेंडर रद्द करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेने आतापर्यंत दोनवेळा मुंबईतील रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरण कामाची टेंडर रद्द केली आहेत. महापालिकेला आता नव्याने टेंडर काढावे लागणार असून या कामासाठी आणखी काही महिन्यांचा अवधी लागणार आहे.
मेसर्स रोडवे सोल्युशन्स इन्फ्रा लिमिटेड (आरएसआयएल) या कंपनीला मुंबई शहरातील विविध रस्त्यांच्या सुधारणा आणि काँक्रिटीकरणासाठी १,२३३ कोटी रुपयांहून अधिकचे टेंडर महापालिकेकडून देण्यात आले. मात्र महापालिकेने हे टेंडर रद्द करत ४ डिसेंबर रोजी कॉंक्रिटीकरणासाठी १,३६२.३४ कोटी रुपयांचे नव्याने टेंडर प्रसिद्ध केले होते. महापालिकेच्या या निर्णयाविरोधात आरएसआयएल कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल खता यांच्या खंडपीठाने महापालिकेच्या नव्या टेंडरला तात्पुरती स्थगिती दिली होती. तसेच याचिकाकर्त्यांच्या प्रश्नावर सुनावणी घेणार की नाही त्याबाबतची विचारणा महापालिकेला केली होती.
महापालिकेच्यावतीने ज्येष्ठ वकील रणजित थोरात आणि ऍड जोएल कार्लोस यांनी बाजू मांडली, त्यांनी खंडपीठाला माहिती देताना सांगितले की १३६२.३४ कोटींचे टेंडर रद्द करण्यात आले आहे. त्यानंतर न्यायालयाने याचिकाकर्त्यां कंपनीने उपस्थित केलेल्या शंकांवर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ३१ जानेवारीपर्यंत सुनावणी घेण्याचे निर्देश दिले व कंपनीची याचिका निकाली काढली. जानेवारी २०२३ मध्ये कार्यादेश मिळूनही तब्बल दहा महिने 'रोडवे सोल्यूशन्स इन्फ्रा लिमिटेड' या कंपनीने कामच सुरू केले नव्हते. त्यामुळे रस्त्यांची कामे रखडवणाऱ्या या कंत्राटदाराचे टेंडर रद्द करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. तसेच कंत्राटदाराला ५२ कोटींचा दंडही ठोठावण्यात आला आहे.