मुंबई (Mumbai) : देवनार (Deonar) येथे मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) मोठा गृहप्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला असून, महापालिका कर्मचारी, प्रकल्पग्रस्तांसाठी 22 मजली सहा इमारती बांधण्यात येणार आहेत. यात 300 चौरस फुटांची 2 हजार 68 घरे उभारण्यात येणार आहेत. या गृहप्रकल्पासाठी मुंबई महापालिका तब्बल 709 कोटी 77 लाख रुपये खर्च करणार असून मुंबई महापालिकेचे प्रशासक डॉ. इकबालसिंह चहल यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. 'एजीएसए इन्फ्रा ऍण्ड कन्स्ट्रक्शन कंपनी'ला हे टेंडर मिळाले असून महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा 3.96 टक्के अधिक दराने हे काम संबंधित कंत्राटदाराला मिळाले आहे.
चेंबूर एम-पूर्व प्रभाग कार्यालयासमोर 600 टेनामेंट हा महापालिकेच्या मालमत्ता विभागाच्या मालकीचा मोकळा भूखंड आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या भूखंडाचा पुनर्विकास करण्याच्या विचारात प्रशासन होते. यासाठी ऑगस्टमध्ये टेंडर मागवण्यात आले होते. या भूखंडावर कर्मचारी वसाहत बांधून त्यात प्रकल्पग्रस्तांसाठी काही घरे राखीव ठेवली जाणार आहेत. महापालिकेच्यावतीने रस्ते रुंदीकरण, नाले खोलीकरण व विस्तार, उड्डाणपूल यासह विविध प्रकल्प राबवण्यात येतात. या ठिकाणी असलेली घरे व दुकाने बाधित होत असल्याने प्रकल्पबाधितांना पर्यायी जागा देणे कायद्यानुसार बंधनकारक आहे.
प्रकल्पबाधितांसाठी शहर आणि उपनगरात 14 हजार सदनिका बांधण्याची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 'एजीएसए इन्फ्रा ऍण्ड कन्स्ट्रक्शन कंपनी'ला हे टेंडर मिळाले असून महापालिकेने अंदाजित केलेल्या दरापेक्षा 3.96 टक्के अधिक दराने हे काम संबंधित कंत्राटदाराला मिळाले आहे. बांधकामासाठी 41 हजार 584 रुपये प्रतिचौरस मीटर दर कंत्राटदार आकारणार आहे. या प्रकल्पात दुकाने, बालवाडी, मुलांचे संगोपन केंद्र, सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्प, बोअरवेल, इंटरनेट सुविधा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, अग्निसुरक्षा यंत्रणा, बहुउद्देशीय सभागृह, वेल्फेअर सेंटर व व्यायामशाळा आदी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.