मुंबई (Mumbai) : मुंबईची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) दहिसर जकात नाक्यावर ट्रान्सपोर्ट हब उभारणार आहे. 900 कोटींच्या या प्रकल्पात मोठ्या प्रवासी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे. बीएमसीने त्यासाठी सल्लागार नेमला आहे. मुंबईत येणाऱ्या वाहनांच्या सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे.
केंद्राच्या धोरणामुळे 2017 पासून जकात कर पद्धती रद्द होऊन देशात एकच जीएसटी कर प्रणाली सुरू झाली आहे. यामुळे मुंबईच्या सीमेवर असणारे महापालिकेचे जकात नाके गेल्या पाच वर्षांपासून बंद आहेत. त्यामुळे या जगात नाक्यावर पार्किंग आणि बिझनेस हब उभारावे अशी संकल्पना मांडण्यात आली होती.
मुंबईत इतर राज्य जिल्ह्यातून येणारी हजारो वाहने या ठिकाणी थांबवल्याने मुंबईत होणारी वाहतूक कोंडी फुटणार आहे. वाहनांची संख्या कमी होणार असल्याने पर्यायाने वायू प्रदूषण कमी होण्याची मोठी मदत होणार आहे. या ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इथे प्रवासी वाहने थांबविल्यानंतर मुंबई शहरात जाण्यासाठी प्रवाशांना पर्यायी सुविधा मिळणार आहे. या ठिकाणावरुन प्रवाशांना मुंबईत जाण्यासाठी बेस्ट, मेट्रो, मोनो, रेल्वे, रिक्षा, टॅक्सी अशा वाहतुकीने जोडण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले.
महापालिकेच्या माध्यमातून पाचपैकी दहिसर आणि मानखुर्द अशा दोन जकात नाक्यावर ट्रान्सपोर्ट बिजनेस हब उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मानखुर्द नाक्यासाठी सुमारे 300 कोटींचा खर्च केला जाणार आहे. दहिसर येथील पाच एकर जागेत अंडरग्राउंड पार्किंग आणि बहुमजली इमारती उभारण्यात येईल. त्यामुळे या ठिकाणी कार्यालयासाठी जागा उपलब्ध होणार आहे. यातून महापालिकेला महसूलही मिळणार आहे शिवाय शॉपिंग सेंटर, फूड कोर्ट अशा सुविधाही उपलब्ध झाल्याने नागरिकांसाठी सुविधा निर्माण होणार आहेत.