मुंबई महापालिका १०० रुग्णालयांचे रुपडे पालटणार; नेमणार सल्लागार
मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) यंदा मुंबईकरांना प्रमुख रूग्णालयांच्या स्तरावर अधिकाधिक आरोग्य सुविधा देण्यासाठी १०० रुग्णालयांचे आधुनिकीकरण करणार आहे. त्यापैकी १० रुग्णालयात प्रायोगिक तत्वावर या आरोग्य सुविधा देण्यात येणार असून, त्यासाठी सल्लागार नेमून प्रोजेक्ट रिपोर्ट घेण्यात येणार आहे.
महापालिका रुग्णालय स्तरावर दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्यास इतर प्रमुख व सर्वसाधारण रुग्णालयांवरील आरोग्य सुविधांवरचा ताण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. शिवाय नागरिकांना आता कान, नाक, घसा, त्वचा, नेत्र विकार आदींवर उपचार घेण्यासाठी मोठ्या रुग्णालयात जाण्याची गरज भासणार नाही. मुंबईकरांना आरोग्य सुविधांबाबत मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात १०० रुग्णालयात आधुनिक वैद्यकीय सुविधा बहाल करण्याचे वचन दिले होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला या वचनाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यानुसार मुंबई महापालिका आरोग्य विभागाने पालिकेच्या १०० ठिकाणी रूग्णालय स्तरावरील आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याचे अभिवचन दिले होते. आता पालिका प्रथम १० ठिकाणी रूग्णालय स्तरावरील आरोग्य सुविधा उपलब्ध करणार आहे. त्यासाठी तज्ज्ञ सल्लागाराचे मत जाणून घेण्यात येणार आहे.
'त्या' १० दवाखान्यांची यादी
(१) एच / पश्चिम विभाग गुरुनानक दवाखाना
(२) के /पूर्व विभाग व्ही. व्ही. शिरोडकर दवाखाना
(३) के/ पश्चिम विभागात वाडिया दवाखाना व बनाना दवाखाना
(४) पी/ उत्तर विभाग राथोडी दवाखाना
(५) आर / दक्षिण विभाग शैलजा गिरकर दवाखाना
(६) आर / मध्य विभागात काजूपाडा दवाखाना
(७) आर / उत्तर विभागात वाय.आर. तावडे दवाखाना
(८) एन वार्ड विभागात साईनाथ दवाखाना
(९) एस वार्ड विभागात टागोरनगर दवाखाना
(१०) डीडीयू मार्ग दवाखाना