मुंबई (Mumbai) : मालाड पश्चिम येथील मालाड हिल रिझरवायर ते लोखंडवाला कॉम्प्लेक्स यादरम्यान मुंबई महापालिका (BMC) 900 मीटर लांबीचा नवीन पूल बांधणार आहे. या कामासाठी महापालिका 180 कोटी रुपये खर्च करणार आहे. या पुलामुळे बोरिवली ते मुलुंड हा प्रवास अवघ्या एका तासात करता येणार आहे.
हा पूल गोरेगाव -मुलुंड लिंक रोडला जोडण्यात येणार आहे. यादरम्यानचा सर्व्हिस रोडही सिमेंट-काँक्रिटचा करण्यात येणार आहे. मुंबईत वाढणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी महापालिका मालाड हिल रिझरवायर ते लोखंडवाला कॉम्प्लेक्सला जोडणाऱ्या अप्पापाडापर्यंत 18.30 मीटर डीपी रोड फेज वनचा विकास करण्यात येणार आहे.
यासाठी डिझाईन, बिल्ट, काँक्रिट पूल, स्टील ब्रिज, टनेल ब्रिज व सिमेंट-काँक्रिटचे बांधकाम तसेच 36.60 डीपी रोडच्या कामासाठी अहवालाची समीक्षा, प्रोजेक्ट रिपोर्ट, गुणवत्ता हमी, गुणवत्ता नियंत्रण व गुणवत्ता ऑडिटसाठी प्रकल्प व्यवस्थापन कन्सल्टंटची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी टेंडर प्रक्रिया राबविण्यात येत आहे. गोरेगाववरून पूर्व उपनगरात मुलुंड जाण्यासाठी जीएमएलआर बांधला जात आहे.