Mumbai News मुंबई : सर्वसामान्यांसाठी घरे बांधणारे म्हाडा (MHADA) प्राधिकरण आता व्याजाच्या पैशांनी मालामाल होणार आहे.
म्हाडाने आपल्याकडे असलेल्या सुमारे बाराशे कोटी रुपयांचा निधी ठेव स्वरूपात वेगवेगळ्या बँकांमध्ये ठेवला आहे. त्या माध्यमातून ‘म्हाडा’ला आठ टक्क्यांहून अधिक व्याज मिळणार आहे.
घरांच्या विक्रीच्या माध्यमातून ‘म्हाडा’कडे कोट्यवधी रुपयांचा निधी जमा होत असला तरी वेगवेगळ्या ठिकाणी बांधकाम सुरू असलेल्या गृहप्रकल्पांवरही तेवढाच खर्च करावा लागतो.
सर्व खर्च भागवून शिल्लक राहणारा निधी बँकांमध्ये ठेव स्वरूपात ठेवण्यासाठी बँकांकडून व्याजदराबाबत प्रस्ताव मागवले होते. त्यानुसार आयडीबीआय बँकेने ८.०५ टक्के, तर कॅनरा बँकेने ७.६५ टक्के एवढ्या दराने ठेवींवर व्याज देण्याची तयारी दर्शवली होती. ‘म्हाडा’ने तब्बल बाराशे कोटी रुपयांच्या ठेवी या दोन्ही बँकांसह इतर बँकांमध्ये ठेवल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मागील वर्षी म्हाडाने ठेव रुपाने केवळ २०० कोटी रुपये ठेवले होते. त्या तुलनेत यंदा ठेवींचे प्रमाण सहा पटीने वाढल्याने व्याज रुपाने मिळणारा परतावाही चांगला मिळणार असल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.