मुंबई (Mumbai) : केंद्राकडून परवानगीची प्रक्रिया पूर्ण करून मुंबईतील दुसरा मेट्रो मार्ग मार्चमध्ये कार्यान्वित करु, अशी ग्वाही मुंबई उपनगर जिह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.
अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व यादरम्यानच्या मुंबई मेट्रो -7 च्या पहिल्या टप्प्याची ट्रायल रन बुधवारी पार पडली. आरे, दिंडोशी आणि कुरार या मेट्रो स्थानकांदरम्यानच्या कामाची पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी मुंबई मेट्रो -7 च्या तिकिटाचे किमान दर 10 रुपये असणार असल्याची माहिती एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी दिली
मेट्रो सातचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मेट्रो सातची प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी सुरक्षा आयुक्तांची परवानगी आणि इतर प्रमाणपत्रे मिळाले की महिनाभरात मेट्रो सुरू करणे शक्य होणार आहे. मेट्रो-7 आणि मेट्रो-2 अ या मार्गावर एकत्रितपणे पहिल्या फेजमध्ये 20 किलोमीटर मार्गावरील वाहतूक सुरू करता येईल. दुसरा टप्पा 15 कि.मी.चा असणार असून एकूण 35 कि.मी.चा मार्ग सुरू करण्यात येईल असे आयुक्त श्रीनिवास यांनी स्पष्ट केले.
मेट्रो -2 (अ) आणि मेट्रो -7 च्या पहिल्या टप्प्यासाठी एकूण 11 मेट्रो गाड्या वापरण्यात येणार आहेत. या गाड्यांची चाचणी मागील अनेक महिन्यांपासून सुरू आहे. या गाड्यांची सुरक्षा चाचणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे या गाड्या आता प्रवाशांना घेऊन धावण्यासाठी सुसज्ज झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील मेट्रोचे व्यवस्थापन आणि मेट्रो चालविण्याची जबाबदारी एका स्वतंत्र यंत्रणेकडे सोपविण्यात आली आहे. एमएमआरडीएच्या नियंत्रणाखाली असणाऱ्या या संस्थेने आवश्यक मनुष्यबळाची तजवीज केली आहे. या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे.
मुंबई जिह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरे स्टेशनमध्ये मेट्रोची पाहणी करीत आरे ते कुरार मेट्रोतून प्रवास केला. केद्र सरकारच्या रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या मंजुरीनंतर मेट्रो - 7 चा पहिला टप्पा महिनाभरात सुरू होईल असे आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. एकूण 11 मेट्रो ट्रेन पश्चिम उपनगरीवासीयांसाठी उपलब्ध होतील. मेट्रो प्रायोगिक तत्त्वावर न चालविता संपूर्ण तयारीनिशी मेट्रो मुंबईकरांच्या सेवेला सज्ज होणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.
मेट्रो -7 मार्गावरील स्थानके
मेट्रो मार्ग - 7 मार्ग दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व असा एकूण 16.5 कि.मी.चा असून त्यावर 13 स्थानके असणार आहेत. दहिसर पूर्व, ओवरीपाडा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, देवीपाडा, मागाठाणे, पोईसर, आकुर्ली, कुरार, दिंडोशी, आरे, गोरेगाव पूर्व (महानंद डेअरी), जोगेश्वरी पूर्व (जेव्हीएलआर जंक्शन), शंकरवाडी, गुंदवली (अंधेरी पूर्व) या स्थानकांचा समावेश आहे.
मेट्रो - 2 (अ) मार्ग असा असणार…
मेट्रो मार्ग- 2 (अ) हा मार्ग दहिसर ते डी.एन. नगर असा एकूण 18.6 कि.मी.चा असणार असून त्यावर एकूण 17 स्थानके असणार आहेत. या मार्गात दहिसर पूर्व, आनंद नगर, कांदरपाडा, मंडपेश्वर, एकसर, बोरीवली (पश्चिम), शिंपोली, कांदिवली (पश्चिम), धनुकरवाडी, वलणई, मालाड (पश्चिम), लोअर मालाड, पहाडी गोरेगाव, गोरेगाव (पश्चिम) ओशिवरा, लोअर ओशिवरा आणि डी.एन.नगर अशी स्थानके असणार आहेत.