Mumbai Metro News मुंबई : मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने सीप्झ, एम.आई.डी.सी, शितलादेवी, दादर, सिद्धिविनायक, सायन्स म्युझियम, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, सी.एस.एम.टी, चर्चगेट, विधान भवन आणि कफ परेड या १३ मेट्रो स्थानकांजवळ ५०० हून अधिक झाडे लावली आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाला सादर केलेल्या हमीपत्रानुसार, मुंबई मेट्रोच्यावतीने मार्ग-३ च्या मेट्रो स्थानकांवर व शेजारच्या भागात सुमारे २६०० झाडे लावली जाणार आहेत. त्यानुसार मूळ जागी वृक्षारोपण करण्यासाठी तीन ठेके दिले आहेत. हे ठेकेदार रोपवाटीकेत रुजलेल्या झाडांचा पुरवठा, लागवड आणि देखभाल करतील. स्थानकांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या झाडांची मूळ जागी लागवड नुकतीच सुरू झाली आहे.
मुंबई मेट्रो वृक्षारोपण पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. विविध स्थानकांवर बांधकाम उपक्रम पूर्ण झाल्यावर आणि अधिक जागा उपलब्ध झाल्यावर वृक्षारोपण केले जाईल. आम्ही विविध घटकांना आमंत्रित करणारे सार्वजनिक आवाहन देखील जारी करणार आहोत; सरकारी/खाजगी आस्थापना, परिसर मालक, सहकारी गृहनिर्माण संस्था इ. त्यांच्या जागेत वृक्षारोपण स्वीकारण्यासाठी (किमान १० झाडे). मेट्रोद्वारे नियुक्त केलेले कंत्राटदार वाढ झालेली झाडे लावनू त्यांची तीन वर्ष देखरेख करतील. असे मुंबई मेट्रोचे संचालक (नियोजन आणि रिअल-इस्टेट डेव्हलपमेंट/एन.एफ.बी.आर) श्री. आर. रमणा यांनी सांगितले.
निवडलेल्या झाडांमध्ये फुलांची झाडे, शोभेची झाडे, सदैव हिरवीगार झाडे इत्यादी ७ वर्षे वयाची आणि सर्वसाधारण उंची १५ फूट आहे. मूळ जागी वृक्षारोपण मोहिमेसाठी निवडलेल्या वृक्षांच्या प्रजातींमध्ये महोगणी, बकुळ, पिंपळ, सोनचाफा, निलमोहोर, तामण, कदंब, देशी-बदाम, आकाश-नीम, स्पाथोडिया, ताबेबुया, अम्ब्रेला-वृक्ष, सप्तपर्णी, पिंपळ, पांगारा, जंगली बदाम, चाफा, इ. यांचा समावेश आहे.
आता पर्यंत ५०० होऊन अधिक झाडे लावली आहेत, त्यांची तीन वर्षे देखरेख, नियमित सिंचन त्याच कंत्राटदारांकडे असेल. लागवड केलेल्या झाडांमुळे परिसरातील सामान्य पर्यावरणाला फायदा होईल आणि पर्यावरणीय फायद्यांव्यतिरिक्त जैवविविधतेला मदत होईल.