मुंबई (Mumbai) : मुंबईतील पहिल्या भुयारी मार्गाची अंमलबजावणी करत असलेल्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (मुं.मे.रे.कॉ.) मॉन्सून काळात पाणी साचू नये, याकरता उपाययोजनांसह सज्ज आहे. मुंबई महापालिकेच्या वतीने या पूर्वीच मॉन्सूनसंबंधीत घ्यावयाच्या खबरदारीच्या सविस्तर सूचना सर्व अभियंते तसेच कंत्राटदारांना जारी केल्या आहेत. मॉन्सूनपूर्व उपाययोजना करणे तसेच पावसाळ्याच्या कालावधीत तयारी सुनिश्चित करण्याचे निर्देश महापालिकेच्या वतीने देण्यात आले आहेत. त्यानुसार मुंबई मेट्रोचे अभियंते आणि कंत्राटदारांनी सर्व साइट्सवर मॉन्सूनपूर्व होणारी कामे सुरू केली आहेत. ही सर्व कामे मॉन्सून आगमनापूर्वी पूर्णत्वास येणार आहेत.
पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्या स्वच्छ करणे, त्यातील गाळ काढून टाकणे तसेच कॅच पिट्स (catch pits) बांधणे अशी कामे प्रगतीपथावर आहेत. याशिवाय पावसाळ्यात वाहतुकीमध्ये अडथळा येऊ नये याकरता सर्व बाजूंचे दिशादर्शक, चेतावणी चिन्हे, वाहतूक चिन्हे याची नव्याने रंगरंगोटी करण्याचे काम सुरू असून बॅरिकेट्सवर ब्लिंकर्स साइट्सवर उपलब्ध केले जातील. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणांवर प्रभाव क्षेत्रामध्ये बॅरिकेड्सची दृश्यमानता वाढविण्यासाठी त्याची देखभाल केली जाईल. सुरक्षिततेच्या कारणास्तव पादचाऱ्यांकरता उपलब्ध असलेल्या रेलिंगवर रिफ्लेक्टीव्ह स्टिकर्स (Reflective stickers)लावले जातील. तसेच साइट्सवर नियमितपणे वीजेच्या तारा, केबल वायर्स यांसारख्या विद्युत वाहिन्यांचे ऑडिट केले जाईल. पावसाळ्यात विद्युत आणि दळणवळण (Communication) व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मुंबई मेट्रो संबंधित संस्थांसोबत समन्वय साधेल. बांधकामास्थळी साठलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात येईल. सर्व ठिकाणी पुरेशी रोषणाई केली जाईल. रस्त्यांवरील खड्डे व खराब पॅच ओळखून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहेत. तसेच खराब झालेल्या गटारांची झाकणं बदलण्याचे कामही सुरू आहे.
"मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार मुंबई मेट्रो समन्वय साधून मान्सून काळातील घ्यावयाच्या तयारीवर काम करत आहेत. मुंबई मेट्रोच्या वतीने पावसाळ्यात मेट्रो-३ च्या बांधकामा ठिकाणी सुरू असलेल्या कामांमुळे मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होऊ नये, तसेच स्थानकांच्या परिसरात पाणी साचू नये, याकरता नियुक्त अधिकारी तैनात केले जातील. मेट्रो-३ च्या सर्व बांधकाम ठिकाणांवर ठोस उपाययोजना केल्या जातील. पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षेची संपूर्ण खबरदारी घेणाऱ्या उपाययोजना मुंबई मेट्रो करेल," असे व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे म्हणाल्या.
मुंबई मेट्रो-३ च्या वतीने पावसाळ्यात पुरापासून बचाव करण्यासाठी पुरेशा प्रमाणात डि-वॉटरिंग पंपांची व्यवस्था करण्यात आली आहे. साधारण १.५ एचपी ते ७५ एचपी क्षमतेच्या एकूण ३७१ पंप उपलब्ध केल्या जातील. मुंबई मेट्रोने मेट्रो-३ मार्गावर पावसाळ्याशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आपत्कालीन नियंत्रण कक्ष देखील स्थापन केला आहे. आपत्कालीन नियंत्रण कक्ष क्रमांक +९१ ९१३६८०५०६५ आणि +९१ ७५०६७०६४७७ हे आहेत.