मुंबई (Mumbai) : मुंबईत यंदा पहिल्या दहा महिन्यांतच एक लाखांहून अधिक घरांची विक्री झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या दसऱ्यात गृहखरेदीत तब्बल 37 टक्क्यांची वाढ झाली आहे. याद्वारे राज्य सरकारच्या तिजोरीत तब्बल 9 हजार 221 कोटी रुपये जमा झाले आहेत. येत्या दिवाळीत आणखी घरांची विक्री होण्याची शक्यता आहे.
यंदा सर्वाधिक नोंदणी ही मार्च महिन्यात झाली असून, या महिन्यात एकूण १३ हजार १५१ मालमत्ता नोंदल्या गेल्या आहेत, तर एप्रिलमध्ये १० हजार ५१४ व जून महिन्यात १० हजार ३१९ मालमत्ता नोंदल्या गेल्या. आयकर विभागातर्फे गृह खरेदीदारांना विशिष्ट रकमेवर अतिरिक्त कर वजावट मिळण्याची मुदत मार्च महिन्यापर्यंत होती. त्यामुळे मार्चमध्ये सर्वाधिक मालमत्तांची नोंदणी झाली.
चालू वर्षात मुंबईत महिन्याकाठी १० हजारांपेक्षा जास्त मालमत्तांचे व्यवहार होत त्यांची नोंद झाली आहे. यापैकी ८२ टक्के मालमत्ता या निवासी स्वरूपाच्या असून, उर्वरित १८ टक्के मालमत्ता या व्यावसायिक किंवा अन्य स्वरूपाच्या आहेत. १० कोटी किंवा अधिक किमतीच्या घरांच्या विक्रीतही वाढ झाली.
जागतिक क्रमवारीत मुंबई शहराने १९ वा क्रमांक पटकावला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये जागतिक क्रमवारीत मुंबईचा क्रमांक ९५ होता. जगातील तब्बल ७६ शहरांना मागे टाकत मुंबई १९ व्या क्रमांकावर धडकली आहे.
मोठ्या आकाराचे घर खरेदी करण्याचा ट्रेंड या वर्षात अधिक जोमाने वाढीला लागला असून यंदाच्या वर्षी झालेल्या एकूण व्यवहारात ५७ टक्के घरांच्या किमती या १ कोटी किंवा त्यापेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे.
मुंबई व उपनगरात गेल्या काही वर्षांत सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांपैकी काही कामे मुंबईच्या पश्चिम उपगरात पूर्ण झाली असून, तेथील सेवा कार्यान्वित झाली आहे. या पार्श्वभूमीवर नव्या खरेदीसाठी लोक आवर्जून पश्चिम उपनगरांना पसंती देत असल्याचे दिसून आले आहे.
- मुंबईत गेल्या 10 महिन्यात 1 लाख 4 हजार 852 घरांची विक्री
- राज्य सरकारच्या तिजोरीत 9 हजार 221 कोटी रुपये जमा
- यंदा घरांच्या नोंदणीत सुमारे 37 टक्क्यांची वाढ