मुंबई (Mumbai) : गणेशोत्सवात जनतेला 'आनंदाचा शिधा' पुरवण्याचे कंत्राट अनुभवी ठेकेदारांना डावलून मर्जीतल्या ठेकेदारांना देणारे राज्य सरकार कोंडीत सापडले आहे. टेंडरसाठी पात्र ठरलेल्या 'स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड' या ठेकेदार कंपनीने जे दर सादर केले आहेत त्यानुसार सरकारी तिजोरीला 50 कोटींचा तोटा होणार आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीच्या तोट्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे स्पष्ट शब्दात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बजावले.
सर्व अटी-शर्तींची पूर्तता केली असतानाही 'आनंदाचा शिधा'च्या टेंडर प्रक्रियेत डावलले, असा दावा करीत इंडो अलाईड प्रोटीन फूड्स आणि जस्ट युनिव्हर्सल या कंपन्यांनी अॅड. ऋषिकेश केकाणे व अॅड. निखिल अदकिने यांच्यामार्फत याचिका केल्या आहेत. त्यांच्या याचिकांवर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. 'आनंदाचा शिधा'चे टेंडर देताना सरकारने पक्षपात करून अनुभवी ठेकेदारांना डावलले व किटचा पुरवठा करण्यासाठी जास्त दर सादर केलेल्या मर्जीतल्या कंपन्यांना टेंडर दिले. त्यामुळे सरकारी तिजोरीला मोठा फटका बसणार आहे, याकडे याचिकाकर्त्यांच्या वकीलांनी लक्ष वेधले. त्यांच्या युक्तिवादाची गंभीर दखल घेत खंडपीठाने राज्य सरकारला फैलावर घेतले.
सरकारने 'आनंदाचा शिधा'चे टेंडर देताना 'स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीची निवड केल्यामुळे सरकारी तिजोरीला 50 कोटींचा फटका बसला आहे. एका कंपनीच्या भल्यासाठी सरकारने दोन अनुभवी कंपन्यांना डावलले. यामागे घोटाळा असल्याचा संशय आहे, असे म्हणणे याचिकाकर्त्या कंपन्यांनी मांडले. 'आनंदाचा शिधा' ही योजना जनहितार्थ आहे. गणेशोत्सव जवळ आल्यामुळे वेळेची मर्यादा असली तरी सरकारी तिजोरीच्या होणाऱ्या तोट्याकडे दुर्लक्ष करणार नाही, असे न्यायालयाने राज्य सरकारला बजावले. तसेच सर्वात कमी दर असलेल्या पात्र ठेकेदारांमध्ये 'आनंदाचा शिधा' पुरवठ्याचे उर्वरित काम विभागून का देण्यात येऊ नये, अशी विचारणा सरकारला केली आणि बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत.
कोण आहे 'स्मार्ट' ठेकेदार??
या निमित्ताने राज्य सरकार ५० कोटींची अतिरिक्त खैरात करीत असलेला 'स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड' हा ठेकेदार कोण आहे याची चर्चा सुरु झाली आहे. या योजनेसाठी गेली २ वर्षे नागपूरचे उज्वल पगारिया आणि मुंबईतील 'शिवालिका' फेम विवेक जाधव हे बलाढ्य ठेकेदार काम करीत होते. यावेळी पहिल्यांदाच उपरोक्त कंपनीला हे टेंडर देण्यात आले आहे. पुण्यातील ठेकेदार चंद्रकांत गायकवाड यांच्याशी संबंधित 'ब्रिस्क इंडिया' कंपनीचे 'स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड' हे नवे व्हर्जन आहे. दोन्ही कंपन्यांचे सीआयएन क्रमांक, पत्ते सुद्धा एकच आहेत. गेल्या काळात ब्रिस्क इंडिया' कंपनी बदनाम झाली असल्याने 'स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड' या नव्या कंपनीच्या नावावर मोठं मोठी कामे घेण्याचा सपाटा सध्या सुरु आहे. राज्य सरकारमध्ये विविध विभागांचे मनुष्यबळ पुरवठ्याची हजारो कोटींची कामे अलीकडेच या कंपनीला मिळाली आहेत. चंद्रकांत गायकवाड यांच्यामागे 'व्ही.डी.' नावाच्या एका मोठ्या ठेकेदाराचा हात असल्याची चर्चा आहे. 'व्ही.डी.' मूळचे नागपूर पण गेली काही वर्षे दुबईस्थित उद्योजक, ठेकेदार आहेत. पुण्यात सुद्धा त्यांच्या कंपन्यांचा मोठा पसारा आहे. गायकवाड यांनी सध्या त्यांच्यासोबत हातमिळवणी केली आहे. त्याचमुळे पगारिया, जाधव यांच्यासारख्या मोठ्या ठेकेदारांना आव्हान देण्याचे धाडस गायकवाड यांनी केल्याचे मानले जाते.