मुंबई (Mumbai) : मिरा-भाईंदर शहरांची वाटचाल खड्डेमुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे. महानगरपालिका हद्दीतील २१ किलोमीटरचे रस्ते सिमेंट काँक्रिटचे बांधण्यात येणार आहेत. या कामांवर ३८४ कोटी खर्च केले जाणार आहेत.
मिरा-भाईंदर शहरातील सर्व रस्ते हे सिमेंट काँक्रिटचे करण्याचा निर्धार महानगरपालिकेने केला आहे. त्यानुसार आतापर्यंत काही ठिकाणी रस्त्यांचे काम झाले आहे. उर्वरित रस्त्यांच्या कामांसाठी महापालिकेकडे निधीची कमतरता आहे. हे काम कर्ज घेऊन पूर्ण करण्याचा विचार प्रशासकीय स्तरावर होता. मात्र सध्याची महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्यामुळे त्यास विरोध होत आहे. त्यामुळे या कामाची जबाबदारी एमएमआरडीएने (मुंबई प्रदेश विकास प्राधिकरण) स्वीकारावी अशी मागणी महापालिकेकडून करण्यात आली होती.
त्यानुसार विस्तारित मुंबई पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत मिरा-भाईंदरमध्ये सिमेंट रस्त्याची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात, शहराचे सर्वेक्षण केल्यानंतर ४७ ठिकाणी साधारण २१.८० किलोमीटर लांबीचा मार्ग निश्चित करण्यात आला आणि यासंदर्भात २४ मार्च २०२३ रोजी टेंडर प्रसिद्ध करण्यात आले होते. यासाठी सुमारे ३८४ कोटी रुपये इतका खर्च निर्धारित करण्यात आला आहे.
या कामाची गुणवत्ता चांगली ठेवण्यासाठी टेंडरचे चार भागात विभाजन करून एका कंत्राटदारास केवळ एकाच टेंडरमध्ये सहभागी होता येणार येईल, अशी अट टाकण्यात आली आहे. त्यानुसार टेंडर प्रक्रियेला आलेल्या प्रतिसादानंतर टेंडर समितीने यामध्ये पात्र ठरवलेल्या कंत्राटदारांची निवड केली आहे. तसेच याबाबत कामाचे कार्यादेश देण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
मिरा-भाईंदर शहरात नव्याने तयार केले जाणारे सिमेंट रस्ते हे मुख्य मार्गाशी जोडले जाणार आहेत. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या मार्गी लागणार असून, इंधन बचत होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय या रस्त्यांची निर्मिती करत असताना पर्जन्य वाहिन्यांसह दोन्ही बाजूस पदपथाची निर्मिती केली जाणार आहे.