मुंबई (Mumbai) : राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प गोरगरीब, सामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवा पिढी, मागासवर्गीय या सर्वांचा भ्रमनिरास करणारा आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला. राज्याची आर्थिक स्थिती बिघडवणारा, उधळपट्टीला आणि भ्रष्टाचाराला वाव देणारा अर्थसंकल्प असल्याने राज्यविधीमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कामकाज सुरू होण्यापूर्वीच विधिमंडळ परिसरात विरोधक आक्रमक होत 'अर्थसंकल्पात घोषणांचा सुकाळ शेतकऱ्यांसाठी निधीचा दुष्काळ, अर्थसंकल्पात गोलमाल कंत्राटदार मालामाल' म्हणत सरकारच्या विरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केली.
विधानसभा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि महाविकास आघाडीच्या आमदारांनी अंतरिम अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही ट्रिपल इंजिन सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, राज्याला कर्जबाजारी करणाऱ्या सरकारचा, कामगारांच्या तोंडाला पाने पुसणाऱ्या सरकारचा, जनतेवर कर्जाचा डोंगर लादणाऱ्या सरकारचा, जुन्या पेन्शनबद्दल खोटी आश्वासने देणाऱ्या सरकारचा, पाणी न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत विकासाच्या नावाखाली राज्यातील जनतेची घोर फसवणूक करणाऱ्या फसव्या सरकारचा निषेध केला.
यावेळी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे विधानपरिषद गटनेते सतेज बंटी पाटील, अभिजित वंजारी, नितीन राऊत, विकास ठाकरे, संग्राम थोपटे, सुरेश वरपुडकर, प्रतिभा धानोरकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) सचिन अहिर, रमेश कोडगावकर, विलास पोतनीस, सुनील शिंदे , राजन साळवी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गटाचे) रोहित पवार, सुनील भुसारा यांच्यासह विरोधी पक्षाच्या आमदारांनी राज्यात विकासाच्या नावाखाली घोर फसवणूक करणाऱ्या सरकारच्या विरोधात 'अर्थसंकल्पात गोलमाल कंत्राटदार मालामाल, सत्ताधारी आमदार तुपाशी जनता मात्र उपाशी, पीक विमा कंपन्या जोमात शेतकरी कोमात, विक्रमी पुरवणी मागण्या आमदार फोडण्यासाठी आणि फोडलेले सांभाळण्यासाठी' या घोषणा, लिहिलेले फलक हातात घेत जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.