मुंबई (Mumbai) : अंधेरीतील गोखले पुलाच्या दुसऱ्या गर्डरच्या ३२ भागांपैकी ५ भाग मुंबईत पोहोचले आहेत. उर्वरित सर्व भाग येत्या 20 ते 22 एप्रिलपर्यंत येणार असून, दुसऱ्या बाजूचा गर्डर मे अखेरपर्यंत बसवण्यात येणार आहे.
अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाच्या दुसऱ्या बाजूच्या गर्डरचे काही भाग मुंबईत दाखल झाले आहेत. पंजाब, हरियाणा, अंबाला येथील कारखान्यात गर्डरचे भाग तयार करण्यात आले आहेत.
शेतकरी आंदोलनामुळे गर्डरचे सुटे भाग मुंबईत येण्यास उशीर झाला असला तरी आता दुसऱ्या बाजूच्या गर्डरचे सुट्टे भाग मुंबईत दाखल झाल्याने गोखले पुलाच्या कामाला वेग येईल, असा विश्वास मुंबई महानगरपालिकेच्या पूल विभागाकडून व्यक्त करण्यात आला.
गर्डरचे एकूण 32 भाग असून त्यापैकी 5 भाग गुरुवारी मुंबईत आले आहेत. उर्वरित 27 भाग पुढील पंधरा ते वीस दिवसांत टप्प्याटप्प्याने मुंबईत दाखल होणार आहेत. पुलाच्या जागेवर या सुट्या भागांची जोडणी करून गर्डर बनवून तो पुलावर बसविण्यात येणार आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या पूल विभागाकडून देण्यात आली.