मुंबई (Mumbai) : मुंबईची लाईफलाईन ठरणाऱ्या सागरी महामार्गाला (कोस्टल हायवे) छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सवात मुख्यमंत्री शिंदे यांनी ही घोषणा केली.
या महोत्सवाला पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, आरोग्य मंत्री प्रा. डॅा.तानाजी सावंत, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार यामिनी जाधव, राजमाता जिजाऊ यांचे वंशज विजयराव जाधव आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य, बलिदान नव्या पिढीला दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहे. राज्यातील गड, किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मृतिस्थळ वढू बुद्रुक आणि तुळापूर या दोन्ही जागांचा विकास आराखडा राबविण्यात येत आहे. हा ऐतिहासिक ठेवा येणाऱ्या पिढीला प्रेरणादायी ठरणार आहे. मुंबईतील कोस्टल हायवे परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा दिमाखदार पुतळा उभारला जाईल. मराठा समाज बांधवांना सर्व सोयीसुविधा देण्याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचे शिंदे यावेळी म्हणाले.
छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मुंबईतल्या गेटवे ॲाफ इंडिया येथे पहिल्यांदाच साजरी होतेय याचा आनंद आहे. महोत्सवाच्या माध्यमातून त्यांचे स्मरण प्रेरणादायी आणि स्फूर्तीदायक असून शिवशंभुरायांचे कार्य, योगदान जतन करणे ही आनंदाची बाब आहे. छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सव देशभरात पोहचवला जाईल. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा भव्यदिव्य करण्याची तयारी देखील राज्य शासन करित असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
कोस्टल रोड दृष्टीपथात -
मुंबई कोस्टल रोड प्रकल्प यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात पूर्ण करण्याचे उद्धिष्ट मुंबई महापालिकने आखले आहे. मुंबई महापालिकेच्यावतीने 12 हजार 721 कोटी रुपये खर्च करून हा महत्त्वकांक्षी कोस्टल रोड बांधण्यात येत आहे. प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वांद्रे-वरळी सी लिंकच्या वरळीच्या टोकापर्यंतच्या 10.58 कि.मी. लांबीच्या या रस्त्यामुळे सुमारे 70 टक्के वेळेची बचत होईल. इंधन, ध्वनिप्रदूषण व वायुप्रदूषणात घट होईल. या प्रकल्पामुळे मुंबईकरांना मलबार हिलपासून वरळी सी फेसपर्यंत तब्बल सात किलोमीटर लांबीचा अत्यंत सुंदर समुद्र किनारा लाभणार आहे. या किनाऱ्यावर हिरवीगार उद्याने, सायकल ट्रक, जॉगिंग ट्रक आणि कोस्टल रोडच्या मार्गावर नावीन्यपूर्ण प्रकाश योजना असेल. त्यामुळे मुंबईच्या सौंदर्यात भर पडणार आहे.
या प्रकल्पासाठी एकूण 111 हेक्टर क्षेत्रावर भराव घालण्यात आला आहे. सध्या या कोस्टल रोडचे काम युद्धपातळीवर सुरू असून या मार्गावरील जवळजवळ 70 हेक्टर हरित क्षेत्र निर्मितीमुळे प्रदूषण आणि बांधण्यात येणाऱ्या सागरी तटरक्षक भिंतीमुळे सागरी किनाऱ्याची धूप होणार नाही. वादळी लाटांपासूनही संरक्षण होईल. कोस्टल रोडच्या मार्गावर मुंबईतील प्रसिद्ध हाजी अली, महालक्ष्मी मंदिर आणि वरळी येथे सार्वजनिक पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. या कोस्टल रोड अंतर्गत 2.7 कि.मी. लांबीचे दुहेरी बोगद्यांचे काम सुरू असून जवळपास 11 मीटर अंतर्गत व्यासाचे हे बोगदे आहेत. या बोगद्यात अनेक अत्याधुनिक सोयीसुविधा असणार असून बोगद्यात अग्निशमन यंत्रणादेखील बसविण्यात आली आहे. त्यासाठी जवळपास चार लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधली आहे.