मुंबई (Mumbai) : स्वच्छ-सुंदर मुंबईसाठी महानगरपालिका (BMC) राबवत असलेल्या डीप क्लीनिंग मोहिमेत गेल्या महिनाभरात 102 मेट्रिक टन राडारोडा, 70 मेट्रिक टन कचरा, 25 मेट्रिक टन टाकाऊ मोठ्या वस्तूंचे संकलन करण्यात आले आहे. त्याचबरोबर 634 किलोमीटर लांबीचे रस्ते ब्रशिंग करून पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात आले आहेत. 1,555 कर्मचाऱ्यांनी 175 यंत्राच्या सहाय्याने ही कामगिरी केली आहे.
महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागातील विविध ठिकाणी 6 एप्रिल रोजी व्यापक स्वरूपात सखोल स्वच्छता मोहीम (डीप क्लीनिंग ड्राईव्ह) राबविण्यात आली. या विशेष मोहिमेअंतर्गत रस्ते-पदपथ धूळमुक्त करण्याबरोबरच बेवारस वाहनांची विल्हेवाट, विनापरवाना फलकांवर कारवाई, सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्वच्छता, राडारोडामुक्त परिसर, धोकादायक तारा यांचे जाळे हटवणे आदी कार्यवाही करण्यात आली.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या सखोल स्वच्छता मोहिमेत मुंबईतील कानाकोपऱ्यातील, लहानसहान गल्लीबोळातील राडारोडा, कचरा उचलण्यासह स्वच्छतेची इतरही कार्यवाही होत आहे.
मोहिमेअंतर्गत नुकतीच परिमंडळ-1 मधील विठ्ठलदास ठाकरसी मार्ग, महर्षी कर्वे मार्ग, ऑपेरा हाऊस जंक्शन, चर्नी रोड स्थानक, मौलाना अब्दुल कलाम आझाद मार्ग; परिमंडळ-2 मध्ये दादासाहेब फाळके मार्ग; परिमंडळ-3 मध्ये खेरनगर मार्ग, विवान उद्यान मार्ग; परिमंडळ-4 मध्ये स्वामी विवेकानंद मार्ग, अंधेरी भुयारी मार्ग, सोमवार बाजार, आर. टी. ओ. मार्ग; परिमंडळ-5 मध्ये विठ्ठल नारायण पुरव मार्ग, अणुशक्ती नगर, अंधेरी-घाटकोपर जोड रस्ता, असल्फा आणि साकीनाका मेट्रो स्थानक.
परिमंडळ- 6 मध्ये अमृत नगर, घाटकोपर पश्चिम, स्वामिनारायण चौक, हिरानंदानी जोड मार्ग, कैलास संकुल, महात्मा फुले मार्ग, विद्यालय मार्ग; परिमंडळ-7 मध्ये एम. के. बेकरी परिसर, मुख्य कार्टर मार्ग, नवीन जोड रस्ता कांदिवली, कांदिवली मेट्रो स्थानक यासह विविध ठिकाणी सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.