मुंबई (Mumbai) : मुंबईतल्या वरळी भागात पांडुरंग बुधकर मार्गावर असलेली बॉम्बे डाईंग गिरणीची विस्तीर्ण जागा विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जपानी कंपन्यांचा समूह असलेल्या 'सुमिटोमो'ने ही जागा विकत घेण्याचे ठरविले आहे. कंपनी 18 एकर जागेसाठी तब्बल 5 हजार कोटी रुपये मोजणार आहे. हा सौदा प्रत्यक्षात आला तर मुंबईतील जमिनीचा सगळ्यात मोठा व्यवहार ठरणार आहे.
वाडिया घांदी या लॉ फर्मने त्यांच्या एका अशिलाच्यावतीने नुकतीच एक सार्वजनिक नोटीस प्रसिद्ध केली आहे. वरळी येथील बॉम्बे डाईंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेडच्या 1 लाख स्क्वेअर मीटर जमिनीच्या हक्क, शीर्षक आणि हितासंबंधांची ही नोटीस आहे. वरळी येथील विस्तीर्ण जागेवर बॉम्बे डाईंग मिल उभी आहे. याच परिसरात वाडिया इंटरनॅशनल सेंटर (WIC) ही समूहाच्या मुख्यालयाची इमारत रिकामी करण्यात येत आहे. मुख्यालयातील चेअरमन यांचे कार्यालय दादर-नायगाव येथील बॉम्बे डाईंगच्या जागेत हलविण्यात आले आहे. वरळीतील बॉम्बे डाईंग मिल परिसरातील अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या मालकीचे बास्टियन रेस्टॉरंट देखील बंद करण्यात आले आहे.
ही जागा जपानी कंपन्यांचा समूह असलेल्या 'सुमिटोमो' कंपनीने विकत घेतली आहे. हा सौदा रकमेच्या बाबतीत मुंबईतील सगळ्यात मोठा सौदा असणार आहे. काही वर्षांपूर्वी ब्रूकफिल्ड असेट मॅनेजमेंट कंपनीने हिरानंदानी समूहाची कार्यालये आणि अन्य काही जागा विकत घेतल्या होत्या. हा सौदा 6700 कोटींना झाला होता. मात्र हा सौदा मोकळ्या जागेसाठी झाला नव्हता, कारण या सगळ्या इमारती होत्या. बॉम्बे डाईंगची जागा ही मोकळी जागा आहे. मोकळ्या जागेसाठी इतकी रक्कम मोजली जात असल्याने हा मुंबईतील रकमेच्या बाबतीत सगळ्यात मोठा सौदा असेल. या सौद्याबाबत वाडिया समूहाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
गिरणी जमीन धोरणानुसार, बॉम्बे डाईंगने मनोरंजनाच्या जागेसाठी मुंबई महापालिकेला आठ एकर आणि दादर-नायगाव मिलमधील सार्वजनिक घरांसाठी राज्य गृहनिर्माण प्राधिकरण, म्हाडाला आणखी आठ एकर जागा दिली आहे. मुंबई महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की विकासकाला त्याच्या जमिनीचा काही भाग बीएमसी आणि म्हाडाला दिल्याने 82,000 चौरस मीटरपेक्षा जास्त विकास हक्क हस्तांतरित करण्याचा अधिकार मिळतो. गृहनिर्माण प्राधिकरणाने बॉम्बे डाईंगने दिलेल्या जागेवर स्थलांतरीत आणि आणि गिरणी कामगारांसाठी घरे बांधली आहेत.