मुंबई (Mumbai) : वांद्रे टर्मिनसमध्ये घडलेल्या चेंगराचेंगरीनंतर पश्चिम रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.
आता नियमापेक्षा अधिक सामान घेऊन जाणाऱ्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. १०० बाय १०० बाय ७० सेंटीमीटरपेक्षा अधिक आकाराचे किंवा ७५ किलोपेक्षा जास्त वजनाचे सामान घेऊन जाणाऱ्या प्रवाशांवर दंड आकारला जाणार आहे.
यंदा दिवाळी आणि छटपूजेकरिता मुंबईहून बिहार, उत्तर प्रदेशला जाणाऱ्या गाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे. अनेक प्रवासी मोठमोठ्या बॅग आणि ड्रमसह प्रवास करतात. यामुळे डब्यांमध्ये तसेच फलाटावर ये-जा करण्यात अडचण येते.
वांद्रे टर्मिनसवर अंत्योदय एक्स्प्रेसमध्ये चढताना झालेल्या चेंगराचेंगरीतही हे दिसून आले. या घटनेनंतर पश्चिम रेल्वेने नियमापेक्षा अधिक सामान नेणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.
१०० बाय १०० बाय ७० सेंमीपेक्षा अधिक आकाराचे आणि ७५ किलोपेक्षा जास्त वजनाचे सामान आढळल्यास प्रवाशांवर तत्काळ दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यापुढे स्कूटर, सायकल आणि अन्य सामानांसह मोठ्या आकाराच्या सामानावर वजनात देण्यात येणारी सूट ग्राह्य नसेल. अधिक वजनाचे सामान आढळल्यास त्यांच्यावर डब्याच्या वर्गानुसार सामान्य दराने दंड आकारला जाणार आहे.
वजन आणि आकाराने जास्तीचे सामान असल्यास त्याची रेल्वेच्या कार्यालयात नोंदणी अनिवार्य राहील. तसेच, हे सामान प्रवासी डब्याऐवजी माल डब्यातून न्यावे लागणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली.