Mumbai Ahmedabad Bullet Train News मुंबई : मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे बांधकाम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पासाठी उच्च गुणवत्तेच्या बांधकाम तंत्राचा वापर केला जात आहे. तसेच गेल्या अडीच वर्षांपासून दररोज सुमारे 20,000 कामगारांच्या मेहनतीमुळे बुलेट ट्रेनच्या कामाने वेग घेतला आहे.
नॅशनल हायस्पीड रेल कॉरीडॉर (NHRC) जपानच्या (Japan) मदतीने हा प्रकल्प बांधत आहे. भारताचा हा पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प आहे. या 508 किमी लांबीच्या प्रकल्पावर 12 स्थानके, 24 नदी पूल, 8 डोंगरातील बोगदे आणि एक समुद्राखालील बोगदा आकाराला येत आहे.
मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम गुजरात राज्यात वेगाने सुरू आहे. महाराष्ट्रातील कामांना कोरोनानंतर खरी सुरवात झाली आहे.
महाराष्ट्रातील मुंबईतील बीकेसी येथून या बुलेट ट्रेनचे सुरुवातीचे अंडरग्राउंड स्थानक तयार होत आहे, तसेच बीकेसी ते शिळफाटा असा २१ किमी भुयारी मार्ग खोदला जात आहे. या भुयारी मार्गापैकी सात किमीचा मार्ग ठाणे खाडीखालून जाणार आहे. त्यामुळे हा देशातील समुद्राखालील मार्ग असणार आहे. या मेगा प्रोजेक्टसाठी उच्च गुणवत्तेच्या बांधकाम तंत्राचा वापर केला जात आहे.
या प्रकल्पासाठी गुजरात आणि महाराष्ट्रात दररोज 20,000 क्युबिक मीटर सिमेंट काँक्रिटचा वापर केला जात आहे. या सिमेंटमधून 10 मजल्याच्या आठ इमारतीची निर्मिती होऊ शकते इतके सिमेंट या मार्गासाठी वापरले जात आहे.
आतापर्यंत 13 लाख मोठ्या ट्रांझिट मिक्सरांद्वारे सुमारे 78 लाख क्यूबिक मीटर काँक्रिटींगचे काम पूर्ण झाले आहे. तसेच गेल्या अडीच वर्षांपासून दररोज सुमारे 20,000 कामगारांच्या मेहनतीमुळे बुलेट ट्रेनचे अशा प्रकारचे हे काम करणे शक्य झाले आहे.
मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन या महत्वाकांक्षी योजनेला पूर्ण करताना कॉरिडोरसह विशेष पद्धतीने डिझाईन आणि निर्मित केलेले 65 काँक्रिट बॅचिंग प्लांट्स बनविले आहेत. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते अहमदाबाद हे अंतर 2 ते अडीच तासांत कापता येणार आहे.
गुजरातच्या हद्दीत बिलिमोरा ते सुरत या 35 किमी अंतराच्या मार्गावर डिसेंबर 2026 मध्ये बुलेट ट्रेनची पहिली चाचणी होणार आहे. या मार्गावर एकूण 12 स्थानके असून ३ डेपो देखील बांधले जात आहेत.