मुंबई (Mumbai) : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन (Mumbai-Ahmedabad Bullet Train) मार्गावर ठाणे जिल्ह्यात डेपोच्या कामाचे टेंडर येत्या 15 मार्च 2023 रोजी खुले केले जाणार आहे. तर डेपोशी अनुषंगिक इतर कामांचा समावेश असलेले टेंडर 26 एप्रिल 2023 रोजी खुले केले जाणार आहे.
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी बुलेट ट्रेनचे स्थानक होणार आहे. तिथून ते ठाणे जिल्ह्यातील शिळफाटापर्यंतचा टप्पा पॅकेज सी टू मध्ये येतो. याअंतर्गत ठाणे जिल्ह्यात डेपोचे स्थानक होणार आहे, त्या ठिकाणी डिझाईन, बांधकाम तसेच सिव्हिल वर्क, बिल्डिंग वर्क यासंदर्भातील टेंडर 15 मार्च 2023 रोजी खुले केले जाणार आहे. तर डेपोशी अनुषंगिक इन्स्टॉलेशन, चाचणी, देखभाल सुविधा इतर कामे अशा सर्व बाबींचे टेंडर 26 एप्रिल 2023 रोजी खुले केले जाणार आहे.
बुलेट ट्रेनच्या भुयारी मार्गामध्ये रेल्वे स्थानके, अनेक ठिकाणी पूल, बोगदे होणार आहेत. येथील नागरी कामांसाठी डेपोचा समावेश असलेली इमारत असणार आहे. यामध्ये एकूण तीन इमारती उभ्या केल्या जाणार आहेत. तसेच वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, ठाणे, विरार तसेच बोईसर आणि गुजरात व महाराष्ट्राच्या सीमेलगत शिळफाटा आणि जरोली गावाच्या दरम्यान ठाणे जिल्ह्यात डेपोसाठी जोडणीची कामे केली जाणार आहेत. हे अंतर जवळजवळ 135 किलोमीटर आहे. जे पॅकेज सी ३ मध्ये होणार आहे. याचे टेंडर 15 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गाची एकूण लांबी 508 किलोमीटर इतकी आहे. महाराष्ट्रामध्ये त्यापैकी 156 किलोमीटर आहे. फक्त चार किलोमीटर मार्ग दादरा नगर हवेली या केंद्रशासित राज्यातून जाणार आहे. तर 348 किलोमीटर मार्ग हा गुजरातमधून जाणार आहे. बुलेट ट्रेनची गती तासाला 320 किलोमीटर इतकी असणार आहे. त्यामुळे मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास दोन तास सात मिनिटांत होणार आहे. स्थानकांवरील थांब्याचा वेळ पकडून एकूण प्रवास दोन तास 58 मिनिटांत पूर्ण होणार आहे.
मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेन रेल्वे मार्गामध्ये एकूण बारा स्थानके आहेत. त्यापैकी चार रेल्वे स्थानके महाराष्ट्रात, तर चार रेल्वे स्थानके गुजरातमध्ये होणार आहेत. मुंबईमध्ये वांद्रे कुर्ला संकुल येथे मोठे रेल्वे स्थानक असणार आहे. त्यानंतर ठाणे त्यानंतर विरार आणि बोईसर या ठिकाणी रेल्वे स्थानक उभारली जाणार आहेत. त्यानंतर गुजरातमध्ये वापी बिल्लीमोरा आणि सूरत तसेच भरूच, वडोदरा, आनंद नडियाद, अहमदाबाद येथे स्थानके असणार आहेत.
गुजरातमध्ये बुलेट ट्रेनचे ३ डेपो उभारले जाणार आहेत. महाराष्ट्रामध्ये ठाणे येथे एक डेपो उभारला जाणार आहे. साबरमती या ठिकाणी ऑपरेशनल कंट्रोल सेंटर उभारले जाणार आहे. या बुलेट ट्रेनच्या मार्गाबाबतचे संपूर्ण ऑपरेशन म्हणजे, नियमन साबरमती या डेपोमधून केले जाणार आहे. अशा पद्धतीने डेपो उभारले जाणार आहेत. महाराष्ट्रामध्ये भूसंपादनाची एकूण स्थिती 98.79 टक्के इतकी आहे. तर दादरा नगर हवेली या केंद्रशासित राज्यात 100 टक्के भूसंपादन झालेले आहे. गुजरातमध्ये भूसंपादनाची स्थिती 98.91 टक्के आहे. दोन्ही राज्यातील भूसंपादनाची स्थिती सध्या 98.88 टक्के इतकी आहे. गुजरात आणि दादरा नगर हवेलीत पूल आणि ट्रॅकसाठीचे सिव्हिल वर्क 100 टक्के पूर्ण झाले आहे. तसेच पूल स्टेशन व ट्रॅक इत्यादी बांधकामासाठी 352 किलोमीटरचे टेंडर वितरीत करण्यात आले आहे.