मुंबई (Mumbai) : प्रस्तावित वर्सोवा-विरार सी लिंक प्रकल्पाच्या (VVSLP) अंमलबजावणीसाठी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) तपशीलवार भू सर्वेक्षण करण्यासाठी टेंडर मागवले आहेत. सर्वेक्षणाचा भाग म्हणून ४३ किमीच्या समुद्रीमार्गात म्हणजेच वर्सोवा, चारकोप, उत्तन, वसई आणि विरार या पाच वेगवेगळ्या ठिकाणी भू सर्वेक्षण केले जाईल. समुद्रात येणाऱ्या भूभागाचे भू सर्वेक्षण दोन महिन्यांत पूर्ण होईल, असा अंदाज एमएमआरडीएने व्यक्त केला आहे.
प्रस्तावित प्रकल्पाच्या ठिकाणी असणाऱ्या पृष्ठभागावरील माती आणि खडकांचे परीक्षण केले जाते. कोणत्याही नवीन पायाभूत प्रकल्पांच्या बांधकामासाठी हे निरीक्षण महत्त्वाचे ठरते. डिझाईन आणि स्ट्रक्चरल अभियंत्यांना प्रत्येक प्रकल्पासाठी प्रत्यक्ष बांधकाम आणि बांधकाम आराखडा तयार करताना लावण्यात येणाऱ्या निकषांची शिफारस करण्यासाठी या तपासण्या आवश्यक आहेत.
वर्सोवा-विरार सी लिंक प्रकल्पाची एकूण लांबी ९६ किमी आहे. यापैकी ४३ किलोमीटर मार्ग समुद्रावर बांधण्यात येणार आहे; तर ५३ किलोमीटर मार्ग जमिनीवर बांधण्यात येणार आहे. सी-लिंक दोन टप्प्यात बांधण्यात येणार असून, टप्पा-१ मध्ये वर्सोवा ते वसईदरम्यान आणि टप्पा-२ मध्ये वसई ते विरारदरम्यान बांधकाम केले जाईल. संपूर्ण मार्गावर चार कनेक्टर असतील. यापूर्वी या प्रकल्पाची अंदाजे किंमत ३२ हजार कोटी रुपये होती, ती आता वाढून सुमारे ६३ हजार कोटी झाली आहे.