मुंबई (Mumbai) : राज्यातील कोकण, पुणे विभागासह अन्य काही विभागांत एसटीत चालकांची कमतरता आहे. त्यामुळे, अनेकदा बसगाड्या आगारातच पडून राहतात. त्यामुळे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून (MSRTC) नव्याने 5 हजार कंत्राटी चालकांची भरती करण्यात येणार आहे. येत्या 2 ते 3 दिवसांत या भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे.
राज्यात ऐन दिवाळीत पुकारलेल्या एसटी कामगारांच्या संपामुळे सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागला. तर, एसटी महामंडळाचेही कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. अखेर 5 महिन्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने हा संप मिटला. कामगारांच्या या संपातून बोध घेत एसटी महामंडळाने ही भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून चालकांची संख्या वाढवली जाणार आहे.
महामंडळाने एसटी कामगारांच्या बेमुदत संपानंतर कंत्राटी चालकांची भरती केली होती. मात्र, संप मिटताच या कंत्राटी चालकांना कामावरुन कमी करण्यात आले. तर, काहींना मुतदवाढही देण्यात आली. त्यामध्ये, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, लातूर, बीड, जालना, उस्मानाबाद या विभागांतील कंत्राटी चालकांचा समावेश आहे. त्यामुळे, आता, पाच हजार कंत्राटी चालकांची खासगी कंपनीमार्फत भरती करण्यात येईल. ही भरती टप्प्याटप्प्याने होईल, याबाबतची जाहिरात दोन-तीन दिवसांत काढण्यात येईल, असे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले.
राज्यातील कोकण, पुणे विभागासह अन्य काही विभागांत एसटीच्या चालकांची कमतरता भासत आहे. त्यातूनच, अनेकदा बसगाड्या स्थानकातच पडून राहतात. त्यामुळे, महामंडळाकडून नव्याने 5 हजार कंत्राटी चालकांची भरती करण्यात येणार आहे. सध्या परीक्षा देऊन प्रतीक्षा यादीवर असलेले कर्मचारी हे कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून एसटीत येऊ शकतात. एसटीतील निवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्यास, लवकरच प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी मिळेल, याबाबतचा निर्णय लवकरच होईल, असे व्यवस्थापकीय संचालक चन्ने यांनी स्पष्ट केले.