मुंबई (Mumbai) : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, एमएमआरडीएकडून कल्याण-तळोजा मेट्रोच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर हे काम हाती घेतल्याने आधीच अरुंद असलेला कल्याण शीळफाटा हा रस्ता आणखी अरुंद झाल्याने पावसाळ्यात याठिकाणी मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे, यावरुन एमएमआरडीएला लक्ष्य केले जात आहे.
कल्याण, डोंबिवली पलीकडील वाहनचालकांना रस्ते मार्गे ठाणे, मुंबई, नवी मुंबईत जायचे असल्यास कल्याण शीळफाटा रस्ता हा एकमेव मार्ग आहे. वाढते शहरीकरण आणि वाहन चालकांची संख्या पाहता या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. वाहन कोंडीची ही समस्या सोडवण्यासाठी या मार्गाचे रुंदीकरण व सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात आले. बहुतांश ठिकाणी भूसंपादन प्रक्रिया अडल्याने या मार्गाचे पूर्णपणे रुंदीकरण झालेले नाही. परिणामी वाहन चालकांना कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात वाहनांचा वेग मंदावत असल्याने, तसेच गटारांची बांधणी झाली नसल्याने रस्त्यावर पाणी साचल्याने या कोंडीत आणखी भर पडते. यंदा ही पावसाळ्यात वाहन कोंडीच्या समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागणार आहे. या मार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आल्यानंतर आता मेट्रोचे काम हाती घेण्यात आले आहे. रस्त्याच्या मधोमध मेट्रोचे खांब उभारणीचा पाया खोदला जात आहे. त्यासाठी रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दोन्ही बाजूच्या लेन बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे वाहन कोंडी होत असून पावसाळ्यात ही समस्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. यावरून आता मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी प्रशासनाचे कान खेचले आहेत.
डोंबिवलीकरांसाठी कामाची नसलेली मेट्रो त्यांचीच वाट अडवून बसली आहे. नुकतेच कल्याण-शीळ रस्त्याचे कॉंक्रिटीकरण बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे. आता त्याच्या मधोमध मेट्रोसाठी खड्डे खोदण्याचे काम सुरू केले आहे. खरेतर कल्याण-तळोजा मेट्रोच्या कामासाठी संपूर्ण भूसंपादन झाले नसताना देखील फक्त कल्याण-शीळफाटा रस्त्यावरच खड्डे खोदण्याचे काम सुरू झाले आहे. मेट्रो आली, काम सुरू झाले, जगाला दिसले व याच काळात लोकसभा निवडणुका पण झाल्या ! आता बस्स करा की! मी सतत सांगत आहे, की कल्याण-शीळ रस्त्याला पर्यायी रस्त्यांची आवश्यकता आहे.
जोपर्यंत कल्याण-शीळ रस्त्याला पर्यायी रस्ते होत नाहीत तोपर्यंत कल्याण-शीळ रस्त्यावरचे सुरू असलेले कल्याण-तळोजा मेट्रोचे काम बंद करून या प्रकल्पाचे इतर ठिकाणचे काम सुरू करावे व मधल्या काळात या रस्त्यावरचे पलावा पूल, लोढा प्रिमियर, रूणवाल व अनंतम् येथील जंक्शनवर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करावी व नंतर या रस्त्यावरचे काम सुरू करावे. अन्यथा पावसाळ्यात जनतेला सद्य स्थिती पेक्षा अधिक वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार व त्यांचे प्रचंड हाल होतील. याला पूर्णपणे एमएमआरडीएचे ढिसाळ नियोजन जबाबदार असेल, अशी टीका आमदार राजू पाटील यांनी केली आहे.