मुंबई (Mumbai) : मुंबई शहराच्या विस्तारासाठी नवी मुंबई शहर निर्माण करण्याचे काम वसंतराव नाईकांनी केले, पण महाराष्ट्रभर शहरे बकाल होऊ लागली आहेत. टाऊन प्लॅनिंग म्हणजेच शहर नियोजन हा भाग कुठेच उरला नाही. त्यामुळे तुमच्या भावी पिढीला तुम्ही काय देणार आहात याचा विचार केला पाहिजे, असे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केले.
निवडणुका येतात व जातात राजकारणी फक्त एकमेकांची उणीधुनी काढतात, परंतु सामान्य नागरिकांच्या हाताला काही लागत नाही. मुंबई शहराचे नियोजन इंग्रजांनी केले म्हणून आज मुंबईत शिवाजी पार्क, ओव्हलसारखी मैदाने आहेत. त्यांनी वैद्यकीय सुविधांसाठी केईएम व इतर रुग्णालये तयार केलीत. नवी मुंबई शहराला नवी मुंबई म्हणतो पण या शहराच्या १५ लाखांहून अधिक लोक संख्येला फक्त १ नाट्यगृह आहे. नवी मुंबई डी. वाय. पाटील मैदान आहे. हे डॉ. डी. वाय. पाटील यांचे, मग सरकार का अशी मैदाने निर्माण करू शकत नाही. कारण निवडून देणाऱ्यांना शहर नियोजन म्हणजे काय हे कळतच नाही. त्यामुळे १९४५ चे शिवाजी पार्क आता होणे नाही. निवडणुकीला उभे राहणारे हे देतो ते देतो सांगतात. पण मूलभूत गरजा कोण देणार, हा प्रश्न आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
राज ठाकरे म्हणाले की, आपल्याला पुढे जाऊन नेमकं या महाराष्ट्रामध्ये आणि या नवी मुंबईमध्ये काय करायचं, हे माहित नाही. मला असं वाटतं इथे राहणाऱ्या अनेक लोकांना कल्पना पण नसेल की या भागाचं नाव नवी मुंबई कसं पडलं? ही नवी मुंबई का उभी राहिली? कशासाठी उभी राहिली? काय कारण त्याचं? याचं कारण त्यावेळेच्या राज्यकर्त्यांचा विचार हा खूप व्यापक असायचा. मुंबई आणि मुंबईला लागून नवी मुंबई उभी करावी असा पहिला विचार या महाराष्ट्रात कोणाच्या डोक्यात आला असेल तर त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईकांच्या डोक्यामध्ये आला, अशी माहिती त्यांनी दिली.
राज ठाकरे म्हणाले की, 1950 ते 1970 या वीस वर्षामध्ये वसंतराव नाईक यांच्या लक्षात आलं की मुंबईची लोकसंख्या दुपटीने वाढली आहे. आता मुंबईमध्ये जास्त माणसं राहू शकणार नाहीत. आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी पर्याय उभा करावा लागेल. त्यामुळे आता जे काही सगळं क्षेत्रफळ तुम्हाला दिसतंय अख्ख्या नवी मुंबईचं त्याला त्यावेळी आकार देण्यात आला आणि मग पुढे हळूहळू गोष्टी सुरू झाल्या. त्यानंत मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स आणि समुद्रामध्ये भराव टाकून छोट्या छोट्या गोष्टी उभ्या राहिल्या. हे मी तुम्हाला का सांगतोय? कशासाठी सांगतोय? कारण त्या जागेवर फक्त इमारती उभ्या राहिल्या. त्यांना तुमचा विचार नव्हता. लोकसंख्या वाढत असताना शहर नियोजन करावं लागतं. पण नवी मुंबई शहर आता बकाल होत चाललं आहे, अशी खंतही राज ठाकरे यांनी बोलून दाखवली. नवी मुंबई शहरातील बेलापूर विधानसभा मतदारसंघासाठी गजानन काळे व ऐरोली मतदारसंघासाठी नीलेश बाणखिले यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत त्यांनी आपले विचार मांडले.