मुंबई (Mumbai) : चिपळूण येथे कोसळलेल्या उड्डाण पुलाच्या ठेकेदाराने (Flyover Contractor) उल्हासनगर शहरातील ४१६ कोटीची भुयारी गटार योजनेचे कंत्राट घेतले आहे. उड्डाणपूलाप्रमाणेच भुयारी गटार योजनेचे काम सुद्धा निकृष्ट होण्याच्या भितीमुळे 'ईगल इन्फ्रा' या कंपनीचे टेंडर (Tender) रद्द करण्याची मागणी मनसेचे ठाणे जिल्ह्यातील नेते अविनाश जाधव यांनी उल्हासनगर महापालिका आयुक्त अजित शेख यांची भेट घेऊन केली.
गेले कित्येक वर्षे सुरू असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम हे नेहमीच वादग्रस्त ठरले आहे. नुकतेच रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण येथे बहादूर शेख नाका येथे सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या बांधकामाचा १५० ते २०० मीटरचा मोठा भाग कोसळला आहे. मुंबईतील 'ईगल इन्फ्रा' ही कंपनी या पुलाचे काम करीत आहे.
उल्हासनगरात शेकडो कोटींच्या रस्त्याच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे उघड झाले. तसेच ४०० कोटींची पाणी पुरवठा वितरण योजना राबवूनही शहरात पाणी टंचाईचा प्रश्न कायम आहे. त्याच प्रमाणे ४१६ कोटींची भुयारी गटार योजना वादग्रस्त ठरणार असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
चिपळूण येथे बांधण्यात येत असलेल्या मुंबई गोवा महामार्गावरील उड्डाणपूल कोसळल्याने, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी 'ईगल इन्फ्रा' कंपनीवर टीका केली होती. त्याच कंपनीने उल्हासनगर शहरातील ४१६ कोटींच्या भुयारी गटार योजनेचे कंत्राट घेऊन काही ठिकाणी काम सुरू केले आहे. मात्र या कामावर सर्वस्तरातून टिका होत आहे.
मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी शिष्टमंडळासह आयुक्त अजीज शेख यांची भेट घेतली. यावेळी जाधव यांनी चिपळूण येथील उड्डाणपूल कोसळल्याची आठवण आयुक्तांना करून देऊन निकृष्ट काम करणाऱ्या 'ईगल इन्फ्रा' कंपनीला ४१३ कोटीचे भुयारी गटार योजनेचे काम दिल्याचे सांगितले. निकृष्ट काम करणाऱ्या कंपनीच्या ठेकेदाराला भुयारी गटार योजना देऊ नका. या मागणीचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले.
एका आठवड्यात याबाबत निर्णय घेतला नाही तर आंदोलन करणार असल्याचा इशारा जाधव यांनी आयुक्त अजीज शेख यांना दिला. तर आयुक्तांनी नियमानुसार टेंडर प्रक्रिया पूर्ण करून भुयारी गटार योजनेचा ठेका 'ईगल इन्फ्रा' कंपनीला दिल्याचे यावेळी सांगितले.