मुंबई (Mumbai) : मीरा भाईंदर शहर खड्डेमुक्त करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, एमएमआरडीएने ३८४ कोटी रुपये खर्च करून सुमारे २२ किलोमीटरच्या नवीन रस्त्यांचे काम हाती घेतले आहे. त्याशिवाय काँक्रीटीकरण, गटारांवर स्लॅब टाकणे, खड्डे बुजवणे अशी कामेही सुरू आहेत. पण प्रत्यक्षात कोट्यवधी रुपये खर्च करूनही शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. निकृष्ट कामामुळे अनेक रस्त्यांवर भेगा पडल्या आहेत.
मीरा-भाईंदर शहरात विविध ४७ ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्याचे टेंडर गेल्या वर्षी काढण्यात आले होते. या कामाची गुणवत्ता चांगली रहावी यासाठी चार भागांमध्ये टेंडरचे विभाजन करण्यात आले. एका कंत्राटदाराला केवळ एकच टेंडर मिळेल अशी अट घातली होती. एन. ए. कन्स्ट्रक्शन कंपनी, मां मुंबादेवी कन्स्ट्रक्शन कंपनी, एम.ई. इन्फ्रा कंपनी, मे. बिटकॉन, आर.ई. इन्फ्रा या कंपन्यांना रस्त्यांचे टेंडर देण्यात आले. पण हे ठेकेदार दर्जाहीन काम करत असल्याचे आढळून आले आहे. सिमेंटचे रस्ते बनवताना ड्रायक्लिन काँक्रीट वापरणे आवश्यक आहे. पण हे काँक्रीट ठेकेदारच गायब करतात, अशी चर्चा आहे.
जुन्या डांबरी रस्त्याची खोदाई करून रात्रीच्या वेळेस काँक्रीटचे काम केले जाते. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. चार नंबर खडीमिश्रित लेअरची जाडी २२५ एमएम ठेवणे गरजेचे असताना प्रत्यक्षात ८० ते १०० एमएम इतकीच जाडी ठेवण्यात येते. त्यामुळे कामांचा दर्जा राखला जात नाही अशी तक्रार होत आहे.
सर्व ठेकेदारांनी नियमाप्रमाणे काम करणे अपेक्षित आहे. मात्र कुणी नियमांचे उल्लंघन करीत असेल तर तातडीने कामाची प्रत्यक्ष पाहणी केली जाईल. कामाच्या दर्जाबाबत तडजोड सहन केली जाणार नाही.
- अजय तितरे, अभियंता एमएमआरडीए