मुंबई (Mumbai) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात 'एमएमआरडीए'ने २ टेंडर प्रसिद्ध केली आहेत. यात ठाण्यातील घोडबंदर रोडवरील गायमुख ते फाऊंटन हॉटेलपर्यंत भुयारी रस्ता आणि फाऊंटन हॉटेल ते थेट भाईंदरपर्यंत उन्नत मार्ग बनवण्याच्या कामाचा समावेश आहे. फाऊंटन हॉटेल नाका, वसई ते गायमुख बोगदा ५.५ किमीचा असेल तर फाऊंटन हॉटेल ते भाईंदर उन्नत रस्ता ९.८ किमीचा असणार आहे. या दोन्ही प्रकल्पासाठी अंदाजे २० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
गायमुख ते फाऊंटन हॉटेलपर्यंत नेहमीच प्रचंड वाहतूक कोंडी होते. सध्या या ठिकाणी दोन लेनचा दुहेरी रस्ता असून त्यावरील खड्डे आणि मध्येच येणारा घाट यामुळे वाहतूक कोंडी होत असते. यावर उपाय म्हणून भुयारी मार्ग तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गात दोन्ही दिशेला प्रत्येकी तीन अशा एकूण सहा मार्गिका असतील. यातील मुख्य भुयारी मार्ग हा साडेतीन किलोमीटरचा असेल. भुयारी रस्त्याची लांबी साडेपाच किमी असेल.
फाऊंटन हॉटेल ते भाईंदर हा रस्ता देखील नेहमीच वाहतूक कोंडीचा हॉटस्पॉट ठरतो. याठिकाणी फाऊंटन हॉटेलपासून भाईंदरला जाण्यासाठी एक उन्नत मार्ग बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा रस्ता ९.८ किलोमीटर लांबीचा असेल तर यावर दोन्ही दिशेला चार-चार मार्गिका असतील. वर्सोवा ते भाईंदर हा कोस्टल रोड तसेच ठाणे शहरातील कोस्टल रोड प्रकल्पांचे काम पूर्ण झाल्यानंतर गायमुख ते भाईंदरपर्यंत वाढणारी वाहन संख्या लक्षात घेऊन हे दोन प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत.