मुंबई (Mumbai) : मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने (एमएमआडीए) (MMRDA) पालघर जिल्ह्यातील मनोरपासून वाडा आणि वाडा ते पडघा असा नवा मार्ग विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे येत्या काळात पालघर ते आसनगाव अशी थेट संलग्नता मिळणार आहे. नवा मार्ग उभारण्याची तयारी एमएमआरडीने सुरू केली असून, त्यासाठी सल्लागार नियुक्तीचे टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने (एमएमआडीए) महामुंबई क्षेत्रातील विविध भागांना संलग्नता देण्याचे नियोजन आहे. याअंतर्गत या प्रस्तावित रस्त्यामुळे पालघर जिल्हा व ठाणे जिल्ह्याचा उत्तर आणि मध्य भाग जोडला जाणार आहे. तसेच पालघर ते आसनगाव असा थेट प्रवास शक्य होणार आहे. यामुळे ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
या मनोर ते पडघा रस्ता उभारणीसाठी एमएमआरडीएकडून सल्लागार नेमण्यासाठी टेंडर काढण्यात आले आहे. या टेंडरनुसार हा मार्ग एकूण 45.50 किलोमीटरचा चौपदरी रस्ता असणार आहे. तो बांधण्यासाठी भूसंपादनाची गरज असल्यास त्याचा अभ्यास करणे, रस्ता बांधण्यासाठी एकूण खर्चाचा अंदाज बांधणे, या मार्गावरून होणाऱ्या वाहतुकीचा अभ्यास करणे, डीपीआर तयार करणे व आवश्यक त्या सरकारी परवानग्या घेणे यांसारखी कामे सल्लागाराने करणे अपेक्षित आहेत.