मुंबई (Mumbai) : मुंबई ते नवी मुंबईला जोडणाऱ्या देशातील सर्वात लांबीच्या अटल सेतूवरुन गेल्या सात महिन्यांत विक्रमी ५० लाखांहून अधिक वाहनांनी प्रवास केला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ही माहिती दिली. जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान या मार्गावर तब्बल ५० लाख ४,३५० गाड्या धावल्या आहेत. १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण झाले.
मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याबरोबरच मुंबई शहर आणि नवी मुंबई यामधील दळणवळण वाढण्याच्या दृष्टीने 2004 पासून मुंबई पारबंदर प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारच्या मंजुरीनंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) 21.8 किमी लांबीचा सहा लेनच्या समुद्री मार्गाचे बांधकाम हाती घेतले. मुंबई ट्रान्सहार्बर लिंकचे (एमटीएचएल) नामकरण 'अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू करण्यात आले आहे. अटल सेतू 17,840 कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपये खर्च करून बांधण्यात आला आहे. सुमारे 21.8 किमी लांबीचा 6 पदरी हा पूल असून समुद्रावर तो सुमारे 16.5 किमी लांबीचा तर जमिनीवर सुमारे 5.5 किमी लांबीचा आहे. हा भारतातील सर्वात लांब पूल आहे, तसेच देशातील सर्वात लांब सागरी पूलदेखील आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला यामुळे वेगवान कनेक्टिव्हिटी प्राप्त होणार असून मुंबईहून पुणे, गोवा आणि दक्षिण भारतासाठी प्रवासाच्या वेळेतदेखील बचत होणार आहे. यामुळे मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदर दरम्यानच्या वाहतूक व्यवस्थेत ही सुधारणा होणार आहे. हा मार्ग मध्य मुंबईत शिवडी, मुंबईच्या खाडीवर शिवाजी नगर आणि नवी मुंबईत राष्ट्रीय महामार्ग 348 वर चिरले येथे जोडला आहे. या पुलामुळे थेट रायगड जिल्ह्यात पोहोचता येत असल्याने जेएनपीटी, पुणे, अलिबाग, गोवा या ठिकाणी जाणाऱ्या वाहनचालकांची सोय झाली आहे.
अटल सेतूची वैशिष्ट्ये -
नवी मुंबईच्या न्हावा शेवाला दक्षिण मुंबईच्या शिवडीला जोडणारा
सहा लेनच्या पुलाची लांबी २१.८ किलोमीटर आहे.
१६.५ किलोमीटरचा भाग पाण्यावर तर ५.५ किलोमीटरचा भाग एलिव्हेटेड
अटल सेतूच्या निर्मितीसाठी १७,८४० कोटी रुपये खर्च
अटल सेतूवर वेगाची मर्यादा शंभर किलोमीटर प्रतीतास
दहा देशांच्या तज्ज्ञांच्या मदतीने १५ हजार कौशल्य कामगारांच्या मदतीने सेतूचे बांधकाम
मोटार, टॅक्सी, हलक्या वजनाची वाहने, मिनी बस, लहान ट्रक, अवजड वाहनांना परवानगी
दुचाकी, तीन चाकी, ऑटोरिक्षा, ट्रॅक्टर, कमी वेगाच्या गाड्या, बैलगाडीला परवानगी नाही
मोटारीसाठी २५० रुपये टोल तर रिटर्नसाठी ३७५ रुपये टोल