मुंबई (Mumbai) : भिवंडी (Bhiwandi) शहराला घोडबदंरपासून थेट जोडता यावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) (MMRDA) गायमुख ते पायेगाव, कासारवडवली ते खारबाव आणि कोलशेत ते काल्हेर या तीन ठिकाणी उड्डाणपूल प्रस्तावित केले आहेत. सुमारे १,२०० कोटी खर्चाच्या या उड्डाणपुलांसाठी आता 'एमएमआरडीए'ने वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. 'एमएमआरडीए'ने या प्रकल्पांचा विस्तृत प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्तीचे टेंडर प्रसिद्ध केले आहे.
पहिला गायमुख ते भिवंडीतील चिंचोटी येथील पायेगावपर्यंत १.८० किमीचा खाडी पूल दुसरा कासारवडवली ते भिवंडीतील खारबावपर्यंत जोडणारा ८०० मीटरचा खाडी पूल आणि तिसरा कोलशेत ते भिवंडीतील काल्हेर हा सुमारे ५०० मीटरचा खाडीपूल प्रस्तावित आहे. भिवंडी शहर हे गोदाम आणि वस्त्रोद्योगांचे शहर म्हणून ओळखले जाते. हजारो वाहने या भागातून मुंबई नाशिक महामार्गाने घोडबंदर, गुजरातच्या दिशेने वाहतूक करत असतात. हलक्या वाहनांचाही भार या मार्गावर अधिक असतो. अनेकदा या मार्गावर वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तसेच भिवंडी शहराला थेट ठाण्याशी जोडता यावे यासाठी 'एमएमआरडीए'ने सुमारे १,२०० कोटी खर्चाचे ३ उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला होता.
यामध्ये घोडबंदर येथील गायमुख ते पायेगाव, कासारवडवली ते खारबाव आणि कोलशेत ते काल्हेर येथे हे उड्डाणपूल प्रस्तावित आहेत. हे तिन्ही पूल ठाणे खाडीवरून थेट भिवंडीत जोडले जाणार आहे. त्यामुळे वाहन चालकांचा वेळ आणि इंधनही बचत होणार आहे. तसेच अवजड वाहनांची वाहतूकही थेट घोडबंरच्या दिशेने होणार असल्याने व्यापाऱ्यांना उद्योगांच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळणार आहे. हा प्रकल्प पूर्णत्त्वास नेण्यासाठी 'एमएमआरडीए'ने आता वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. 'एमएमआरडीए'ने या प्रकल्पासाठी सल्लागार नेमण्यासाठी टेंडर प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे सल्लागार नेमल्यानंतर लवकरच प्रकल्पाच्या पायाभरणीला सुरुवात होणार आहे. तसेच हे तीन पूल झाल्यास भिवंडीत नागरिकीकरणही मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.