मुंबई (Mumbai) : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) मोघरपाडा कारशेडच्या (Mogharpada Crashed) कामाचे आर्थिक टेंडर (Tender) नुकतेच खुले केले आहे.
एसईडब्ल्यू इन्फ्रा-विश्व समुद्र इंजिनियरिंग (संयुक्त), एनसीसी लिमिटेड आणि रित्विक प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या तीन कंपन्यांनी या कामासाठी टेंडर भरले आहे. यात 'एसईडब्ल्यू इन्फ्रा-विश्व समुद्र इंजिनियरिंग' या संयुक्त कंपनीने सर्वात कमी दराचे म्हणजेच, ९०५.७७ कोटींचे टेंडर भरले आहे. त्यामुळे मेट्रो ४, ४ अ (वडाळा-ठाणे-कासारवडवली-गायमुख) आणि मेट्रो १० (गायमुख-मिरारोड) मार्गिकेतील रखडलेल्या मोघरपाडा कारशेडच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. ३६ महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.
मुंबई शहरातील तसेच ठाणे आणि मिरारोड शहरातील अंतर कमी करण्यासाठी मेट्रो ४, ४ अ आणि १० अशा मार्गिका हाती घेण्यात आल्या आहेत. मेट्रो ४, ४ अ ची मार्गिका ३५.२५ किमी लांबीची आहे. तर मेट्रो १० ची मार्गिका ९.२ किमी लांबीची आहे. मेट्रो ४ मार्गिकेचा विस्तार मेट्रो ४ अ च्या माध्यमातून तर मेट्रो ४ अ चा विस्तार मेट्रो १० च्या माध्यमातून करण्यात येत आहे. या तिन्ही मार्गिकेचे कारशेड एकाच ठिकाणी अर्थात मोघरपाडा येथे बांधण्यात येणार आहे.
दरम्यान मोघरपाडा येथे कारशेड बांधण्यास स्थानिकांचा प्रचंड विरोध असल्याने कारशेड वादात अडकली होती. मेट्रो मार्गिकांची कामे वेगाने पुढे जात असताना कारशेड रखडल्याने एमएमआरडीएची चिंता वाढली होती. पण कारशेडला असलेला विरोध संपवण्यात एमएमआरडीएला यश आले आहे.
त्यानंतर एमएमआरडीएने ऑगस्ट २०२२ मध्ये मोघरपाडा कारशेडच्या कामासाठी टेंडर मागविले होते. नुकतेच एमएमआरडीएकडून आर्थिक टेंडर खुले करण्यात आले आहे. त्यानुसार ७११.३४ कोटी रुपये खर्चाच्या कारशेडच्या कामासाठी तीन टेंडर सादर झाले आहेत. एसईडब्ल्यू इन्फ्रा-विश्व समुद्र इंजिनियरिंग (संयुक्त), एनसीसी लिमिटेड आणि रित्विक प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या तीन कंपन्यांची टेंडर आहेत. यातील रित्विक प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे टेंडर अपात्र ठरले आहे. त्यामुळे एसईडब्ल्यू इन्फ्रा-विश्व समुद्र इंजिनियरिंग (संयुक्त) आणि एनसीसी लिमिटेड या दोन कंपन्या स्पर्धेत आहेत.
यात एसईडब्ल्यू इन्फ्रा-विश्व समुद्र इंजिनियरिंगची (संयुक्त) आर्थिक टेंडर सर्वात कमी आहे. ९०५.७७ कोटी रुपये अशी बोली या कंपनीने लावली आहे. त्यामुळे या कंपनीला कारशेडच्या कामाचे टेंडर मिळण्याची शक्यता आहे. लवकरच हे टेंडर अंतिम करून कामास सुरुवात करण्यात येणार आहे.
कारशेडच्या कामासाठीच्या आर्थिक टेंडर खुले करण्यात आले आहे. या टेंडरची छाननी सुरू आहे. त्यानुसार लवकरच टेंडर अंतिम करण्यात येईल, अशी माहिती महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी दिली