मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिका आणि रेल्वेने केलेली अंधेरीतील गोखले पुलाची दोषयुक्त पुनर्बांधणी देशाला लाजवणारी असून या पुलाच्या पुनर्बांधणीची जबाबदारी असलेले मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आणि रेल्वेच्या संबंधित अधिकाऱयांच्या निलंबनाचे आदेश जारी करा, अशी मागणी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली आहे. आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात राज्यपाल बैस यांना पत्र लिहिले आहे. गोखले पूल हे राजकारणी-अधिकारी-कंत्राटदार यांच्या संगनमताचे ढळढळीत उदाहरण आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
गोखले पुलाचे बांधकाम चुकल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल आणि सी. डी. बर्फीवाला पूल एकमेकांना जोडणे शक्य नसल्याचे दिसून आले आहे. त्यावरून आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांना हे पत्र दिले आहे. महापालिका आयुक्त चहल आणि रेल्वेच्या समकक्ष अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश जारी करावेत, जेणेकरुन त्यांना या प्रकल्पात हस्तक्षेप करून गडबड करता येणार नाही आणि निर्लज्जपणे करदात्यांच्या कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केल्याबद्दल निष्पक्ष चौकशीला सामोरे जाता येईल, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तांची बदली बऱ्याच काळापासून रखडलेली आहे आणि निवडणूक आयोगाच्या आदेशानंतरही घटनाबाह्य मुख्यमंत्री निवडणूक आयोगाला गृहीत धरत आयुक्तांची बदली करणे टाळत आहेत, याकडेही आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांचे लक्ष वेधले आहे. स्थानिक आमदारांनी अधिकाऱ्यांसह या पुलाला अनेकदा भेट दिली होती, त्यावेळी त्यांना दोष दिसला नाही का? की तो तोडून पुन्हा दुसरा पूल बांधण्यासाठी मुद्दाम हा दोष निर्माण करण्यात आला? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात उपस्थित केला आहे.