मुंबई (Mumbai) : मीरा भाईंदर महापालिका अंतर्गत भाईंदर पूर्वेच्या नवघर गावातील दोन तलाव, गोडदेव गाव तलाव व काशीमीरा येथील जरीमरी तलाव ह्या चार तलावांचे सुशोभीकरण होणार आहे. त्यासाठी ५० कोटींचा खर्च केला जाणार असून महापालिकेने 'गजानन कन्स्ट्रक्शन' या ठेकेदारास या कामाचे टेंडर दिले आहे.
त्यामुळे लवकरच भाईंदर पूर्वच्या ३ तर काशीमीराच्या एक अशा ४ तलावांचे रुपडे पालटणार आहे. आकर्षक संगीत कारंजे, खुली व्यायामशाळा, पाणी शुद्धीकरण यंत्रणा, बैठक व्यवस्था, लँड स्कॅपिंग आदी सुशोभीकरणाची कामे केली जाणार आहे. हे जुने तलाव असून नागरिक व मुलांना विरंगुळ्यासाठी, चालणे, योगा, व्यायाम व फेरफटका मारण्यासाठी या तलावांशिवाय परिसरात अन्य अशी सुविधा नाही. या तलावांचे सुशोभीकरण करून त्याठिकाणी संगीत कारंजे बसविण्यासाठी निधी देण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. गेल्यावर्षी या कामासाठी राज्य सरकारकडून ५० कोटींचा निधी आ. सरनाईक यांच्या मागणीनंतर मंजूर करण्यात आला होता. या चारही तलावांचे सुशोभीकरण करण्याच्या कामासाठी महापालिकने टेंडर प्रक्रिया पूर्ण करुन गजानन कन्स्ट्रक्शन या ठेकेदारास कार्यादेश देण्यात आला आहे.
शहरातील तलावात लागणारे हे पहिले म्यूजिकल फाउंटन आहे. तलावांमधील गाळ काढून ते स्वच्छ केले जातील. तलावातच विसर्जन व इतर धार्मिक विधी होत असल्याने त्यासाठी छोटा २० बाय ४० फुटांचा तलावाचा वेगळा भाग तयार केला जाईल. त्या वेगळ्या तलाव भागातच विसर्जन आणि सर्व धार्मिक कार्यक्रम नागरिक करू शकतील. जेणेकरून मुख्य तलाव हा सुरक्षित , स्वच्छ राहील. ठाण्यात उपवन घाटावर जसे निसर्ग रम्य वातावरण आहे तसेच मीरा भाईंदरच्या या चारही तलाव परिसरात तयार केले जाईल. तलावांच्या आजूबाजूला मोकळ्या जागेत चांगले उद्यान, स्वच्छता गृह केले जाईल. ज्येष्ठ नागरिक, महिला, नागरिक यांच्यासाठी सुविधा असतील. लहान मुलासाठी इलेक्ट्रॉनिक गेम्स बसविण्यात येतील. याच निधीतून नवघर येथील धर्मवीर आनंद दिघे मैदानाचे सुशोभीकरण, कुंपण भिंत व आकर्षक प्रवेशद्वार दोन्ही बाजूने बांधले जातील, अशी माहिती आ. सरनाईक यांनी दिली.
या चारही तलावांच्या मधोमध संगीत कारंजे बसवले जाणार आहेत. दररोज या म्यूजिकल फाउंटनचे २ शो तर सुट्टीच्या दिवशी ३ शो ठेवले जातील. परिसरातील नागरिकांसह शहरातील लोकही ते पाहण्यासाठी येतील. काम पूर्ण झाल्यानंतर म्यूजिकल फाउंटन सुरळीत सुरु राहावा यासाठी ५ वर्षे देखभाल दुरुस्तीची जबाबदारी त्याच ठेकेदाराला दिली आहे. संगीत कारंजे हे लोकांसाठी आकर्षण ठरून शहराच्या सौंदर्यात भर पडेल, असे आ. सरनाईक यांनी सांगितले. नुकतेच या चारही तलावांच्या ठिकाणी कामांचे भूमिपूजन आ. सरनाईक व आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहर अभियंता दिपक खांबीत, शिवसेना जिल्हाप्रमुख राजू भोईर, माजी नगरसेवक विक्रमप्रताप सिंह, वंदना पाटील, संध्या पाटील, मिरादेवी यादव, विकास पाटील, पूजा आमगावकर, निशा नार्वेकर, सचिन मांजरेकर आदी उपस्थित होते.