नागपूर (Nagpur) : कार्यारंभ आदेश मिळूनही मुंबईतील रस्त्यांची कामे सुरू न करणारे मे.रोडवेज सोल्यूशन इंडिया इन्फ्रा लिमिटेड या कंत्राटदराचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. कंत्राटदाराची सुरक्षा रक्कम व अनामत रक्कम जप्त करणेबाबत व दंड वसूल करण्याबाबतची कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.
मुंबईतील रस्त्याची कामे सुरू न करणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करण्याबाबतचा प्रश्न सदस्य सुनील शिंदे यांनी उपस्थित केला होता. बृहन्मुंबई महापालिका अखत्यारीतील सुमारे 397 कि.मी.लांबीच्या 910 रस्त्यांची सिमेंट काँक्रीटद्वारे सुधारणा करण्यासाठी एकूण पाच कंत्राटदारांना जानेवारी, 2023 मध्ये कार्यादेश देण्यात आले होते. त्यामध्ये शहर विभागातील एका कंत्राटदारास 72 कि.मी.लांबीचे 212 रस्ते, पूर्व उपनगरातील एका कंत्राटदारास 71 कि.मी.लांबीचे 188 रस्ते व पश्चिम उपनगरातील तीन कंत्राटदारांना २५४ किमी लांबीचे 510 रस्त्यांच्या कामांचा समावेश होता.
त्यापैकी शहर विभागातील कंत्राटदार मे. रोडवेज सोल्यूशन इंडिया इन्फ्रा. लि. यांनी मे 2023 अखेर पर्यंत (पावसाळ्यापूर्वी) केवळ सात रस्त्याची कामे नाममात्र सुरू करून कोणतेही काम पूर्ण केले नाही. त्यामुळे मे. रोडवेज सोल्यूशन इंडिया इन्फ्रा लिमिटेड या कंत्राटदारास देण्यात आलेले कंत्राट रद्द करण्यात आले असल्याची माहिती मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी दिली. याचर्चेत सदस्य अनिल परब, भाई जगताप, सचिन अहिर यांनी सहभाग घेतला.