मुंबई (Mumbai) : देशातील सर्वात लांब मुंबई-दिल्ली द्रुतगती महामार्ग (Mumbai-Delhi Express way) केंद्र सरकारकडून उभारला जात असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विरार-वडोदरा या टप्प्यातील महामार्गाचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. हे फोटो इतके विलोभनीय दिसत आहेत की ते विदेशातील असावेत असा भास होत आहे. गडकरी यांनी 'प्रगतीचा महामार्ग, गतिशक्ती' हे हॅशटॅग वापरून हे फोटो शेअर केले आहेत. या महामार्गाच्या उभारणीसाठी सुमारे 1 लाख कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्ग हरयाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांना जोडणार आहे. तसेच मुंबई, वडोदरा, सुरत, अहमदाबाद, उज्जैन, इंदूर, उदयपूर, भोपाळ, कोटा, अजमेर, जयपूर, फरिदाबाद, सोहना, दिल्ली ही प्रमुख शहरेही जोडली जाणार आहेत. या महामार्गाला ग्रीन एक्स्प्रेस म्हणूनही ओळखले जाते.
मुंबई-दिल्ली प्रवास सुसाट व्हावा म्हणून केंद्र सरकारने तब्बल 1380 किलोमीटर लांबीच्या मुंबई-दिल्ली द्रुतगती महामार्गाच्या उभारणीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे मुंबई-दिल्लीदरम्यानचे अंतर 130 किलोमीटरने कमी होणार आहे. आठ लेन असलेल्या या महामार्गाने अवघ्या 12 तासांत मुंबईहून दिल्लीला पोहोचता येणार आहे. या महामार्गाच्या उभारणीसाठी सुमारे 1 लाख कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. तसेच या महामार्गाच्या उभारणीसाठी 80 लाख टन सिमेंट, 10 लाख टन स्टिलचा वापर होणार आहे.
दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचा प्ररंभ बिंदू नोएडा येथील डीएनडी उड्डाण पूल आणि हरियाणातील गुरूग्रामजवळील सोहना येथे असणार आहे, तर शेवटचे ठिकाण महाराष्ट्रात विरार आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथे असणार आहे. दिल्ली ते दौसादरम्यान महामार्गाचे 220 किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून लवकरच त्याचे उद्घाटन होणार आहे. सध्या आठ लेन असलेल्या हा महामार्ग भविष्यात 12 लेनचा करण्याची योजना आहे. महामार्गावर विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका असणार आहे. तसेच महामार्ग पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर वर्षाला 32 कोटी लिटर इंधनाची बचत होणार आहे.