मुंबई (Mumbai) : मुंबईतल्या बीडीडी (BDD) चाळींची ओळख मागच्या शंभर वर्षांपासूनची आहे. या ठिकाणी अनेक चळवळी उभ्या राहिल्या आहेत. या ठिकाणी अनेक मुंबईकरांनी, कष्टकऱ्यांनी घाम गाळला आहे. या बीडीडी चाळींना आता नवी ओळख देण्यात आली आहे.
वरळी, ना.म. जोशी मार्ग व नायगाव येथील बी.डी.डी. चाळींच्या पुनर्वसन प्रकल्पाची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. आता या चाळींचे नामकरण करण्यात आले आहे. यापुढे बी.डी.डी चाळ वरळीला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नगर, बी.डी.डी. चाळ ना. म. जोशी मार्गसाठी स्वर्गीय राजीव गांधी नगर आणि बीडीडी चाळ, नायगावला शरद पवार नगर असे संबोधण्यात येईल. त्यानुसार या चाळींच्या नामांतराचा सरकारी निर्णय (जीआर) शुक्रवारी गृहनिर्माण विभागाने प्रसिद्ध केला आहे.
1921-1925 च्या दरम्यान तत्कालीन मुंबई विकास विभागाने या चाळी बांधलेल्या असल्याने, त्या बी.डी.डी. चाळी म्हणून ओळखल्या जातात. या चाळींचा पुनर्विकास होत असल्याने या चाळींचे नामकरण करण्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी 2022 च्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत जाहीर केले होते. त्यानुसार हे नामकरण करण्यात आले आहे.
तत्कालीन मुंबई विकास विभागाने (बी.डी.डी.) सन 1921-1925 च्या दरम्यान मुंबईतील वरळी, ना.म.जोशी मार्ग, नायगांव व शिवडी येथे एकूण 207 चाळी बांधलेल्या आहेत. प्रत्येक चाळ ही तळ + ३ मजल्यांची असून, त्यात प्रत्येकी 80 प्रमाणे रहिवाशी गाळे आहेत. तसेच या बी.डी.डी. चाळींच्या परिसरात झोपडपट्टीसदृश्य बांधकामे स्टॉल्स, दुकाने, सामाजिक / शैक्षणिक संस्था देखील आहेत. या बी. डी. डी. चाळी जवळपास 96 वर्षांपेक्षा जास्त जुन्या झालेल्या असल्याने, त्यांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.