मुंबई (Mumbai) : शिवडीतील (Shiwadi) 12 बीडीडी चाळी या केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर आहेत. या जागेची मालकी राज्य सरकारकडे हस्तांतरित केल्यावर राज्य सरकारला इतर बीडीडी चाळींप्रमाणे शिवडीतील बीडीडी चाळींचाही पुनर्विकास करणे शक्य होईल, अशी माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिली.
मुंबईत वरळी, नायगाव आणि डिलाईल रोडवर असलेल्या बीडीडी चाळींचा विकास होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवडी येथील 12 बीडीडी चाळींचाही पुनर्विकास केला जावा. या चाळी जुन्या झाल्या असून त्यांची दुरवस्था झाली आहे. या चाळीत 960 कुटुंबे असून दुर्घटना झाल्यास जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शिवडीतील चाळींचा पुनर्विकास करावा, अशी मागणी शिवसेना आमदार सुनील शिंदे, विलास पोतनीस यांनी तारांकित प्रश्नावेळी विधान परिषदेत केली.
शिवडी बीडीडी चाळींबाबत माहिती देताना गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सविस्तर माहिती दिली. केंद्र, रेल्वे, राज्य, जिल्हाधिकारी, मुंबई महापालिका असे एकूण नऊ जण मुंबईतील जमिनीचे मालक आहेत. शिवडीतील बीडीडी चाळी या केंद्र सरकारच्या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनीवर आहेत. या जागांचा पुनर्विकास करण्याबाबतचा अहवाल 2018 साली बीपीटीला देण्यात आला आहे. त्याचा पाठपुरावा सुरू आहे. केंद्राने ही जागा राज्य सरकारला हस्तांतरित करावी, अशी विनंती बीपीटीला करण्यात आली आहे. शिवडीतील पुनर्विकास प्रकल्पाला केंद्राने मान्यता दिल्यास आणि राज्य सरकारकडे त्याची मालकी सोपवल्यास शिवडीतील 12 चाळींचा विकास करणे शक्य होईल, अशी माहिती आव्हाड यांनी दिली.