मुंबई (Mumbai) : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित MIDC सुरू करण्यासाठी पाण्याची उपलब्धता, सलग क्षेत्र, वन्यजीव संरक्षण क्षेत्र, इको सेन्सेटिव्ह झोन आदी तांत्रिक बाबी तपासून येत्या तीन महिन्यांत निर्णय घेण्यात येईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी विधान परिषदेत (Vidhan Parishad) सांगितले.
सदस्य राम शिंदे यांनी एमआयडीसी मंजुरीबाबत सद्य:स्थिती काय आहे या अनुषंगाने नियम 97 अन्वये अल्पकालिन चर्चा उपस्थित केली होती.
मंत्री सामंत म्हणाले की, औद्योगिक विकास व्हावा आणि परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने एमआयडीसी क्षेत्राला मान्यता दिली जाते. यासाठी जागा देण्याचे प्रस्ताव उच्चाधिकार समितीकडे येतात. त्यावेळी अनुषंगिक सर्व बाबी तपासून मान्यता देण्यात येते.
कर्जत तालुक्यामध्ये एमआयडीसीला मंजुरी देताना तांत्रिक बाबी तपासून पाहण्याबरोबरच येथे नीरव मोदी यांच्या नावाने जमीन असल्याचे आढळून आले आहे. हे नीरव मोदी नक्की कोण आहेत, याबाबतची चौकशी सुरू आहे. त्याचबरोबर पाण्याच्या उपलब्धतेकरिता जलसंपदा विभागाचा अहवाल प्रलंबित आहे. या सर्व बाबी पडताळून एमआयडीसी क्षेत्र मंजुरीबाबत शासन सकारात्मक असून लवकरच निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
एमआयडीसी सुरू करताना पायाभूत सुविधा आधी निर्माण कराव्यात या मताशी शासन सहमत असल्याचेही ते म्हणाले. जामखेड तालुक्यातील एमआयडीसी क्षेत्रात उद्योग यावेत यासाठी देखील प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य अरूण लाड, सत्यजित तांबे, सचिन अहिर, शशिकांत शिंदे यांनी सहभाग घेतला.