मुंबई (Mumbai) : पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत म्हाडाच्या मुंबई मंडळाला उपलब्ध झालेल्या भूखंडांपैकी चार भूखंडांवर घरे बांधण्यात येणार आहेत. त्यानुसार २,३९८ घरांच्या बांधकामासाठी १,३५० कोटी रुपयांचे टेंडर प्रसिद्ध केले आहे. या प्रकल्पात अल्प, मध्यम आणि उच्च गटासाठी घरे बांधण्यात येणार आहेत. महिन्याभरात टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून वर्षअखेरीस चारही इमारतींच्या बांधकामाला सुरुवात करण्याचे नियोजन आहे. आगामी ४ वर्षांत बांधकाम पूर्ण करण्याची जबाबदारी ठेकेदार बिल्डरवर राहणार आहे.
गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थनगर अर्थात पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प मंडळाकडे आल्यानंतर येथील विक्रीयोग्य घटकातील आणि म्हाडाच्या हिश्शातील भूखंडावर घरे बांधण्यासह भूखंडांच्या ई – लिलावाचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार येथील आर-१, आर-७, आर-४ आणि आर-१३ या तीन भूखंडांवर २,३९८ घरे बांधण्याचा प्रस्ताव मांडून त्यास मंजुरी घेण्यात आली. प्रस्तावानुसार या ४० मजली चार इमारतींमध्ये अल्प गटासाठी १,०२३ घरे, उच्च गटासाठी १३३ घरे आणि मध्यम गटासाठी १,२४२ घरे समाविष्ट असणार आहेत. ४७३ चौरस फूट ते १००० चौरस फुटांची ही घरे असणार आहेत. मुंबई मंडळाने या २,३९८ घरांच्या प्रकल्पासाठी टेंडर प्रसिद्ध केले.
या टेंडरनुसार आर-१ भूखंडावरील मध्यम आणि उच्च गटासाठीच्या एकूण ५७२ घरांच्या बांधकामासाठी अंदाजे ३७७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर आर-७ भूखंडावरील अल्प आणि मध्यम गटासाठीच्या एकूण ५७८ घरांसाठी ३०८ कोटी रुपये, तर आर-४ भूखंडावरील अल्प आणि मध्यम गटातील १०२५ घरांसाठी अंदाजे ५०२ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. आर-१३ भूखंडावरील मध्यम आणि उच्च गटासाठीच्या एकूण २२३ घरांसाठी अंदाजे १६७ कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यानुसार १,३५० कोटी रुपयांहून अधिक रकमेचे टेंडर मंडळाने प्रसिद्ध केले आहे.
म्हाडाने गोरेगाव पहाडी येथे पहिल्यांदाच ३९ मजली इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. आता पत्राचाळीच्या जागेवर ४० मजली ४ इमारती बांधण्यात येणार आहेत. टेंडर सादर करण्याची अंतिम तारीख १९ सप्टेंबर आहे. तर २० सप्टेंबर रोजी टेक्निकल टेंडर खुले केले जाणार आहे. महिन्याभरात टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून वर्षअखेरीस चार इमारतींच्या बांधकामाला सुरुवात करण्याचे मुंबई मंडळाचे नियोजन आहे. त्यानंतर आगामी चार वर्षांत बांधकाम पूर्ण केले जाणार आहे.