मुंबई (Mumbai) : गोरेगाव (Goregaon) पश्चिमेकडील मोतीलाल नगर येथील म्हाडा (MHADA) वसाहतींच्या पुनर्विकासासाठी तीन कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे. यापैकी श्री नमन ग्रुप ही कंपनी तांत्रिक टेंडर प्रक्रियेत अपात्र ठरली असून आता पुनर्विकासासाठी अदानी, एलअँडटी या दोन कंपन्यांमध्ये स्पर्धा राहणार आहे. पुनर्विकासासाठी आलेल्या कंपन्यांची माहिती म्हाडा उच्च न्यायालयात सादर करणार असून न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करणार आहे.
मोतीलाल नगर 1, 2 व 3 वसाहत सुमारे 50 हेक्टर जागेवर वसली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा प्रकल्प म्हाडा स्वत: राबवणार आहे. तथापि, म्हाडाला हा प्रकल्प राबविणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याने हा पुनर्विकास प्रकल्प कंन्स्ट्रक्शन अँण्ड डेव्हलपमेंट एजन्सीची नेमणूक करुन प्रकल्प राबविण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
या प्रकल्पांतर्गत निवासी वापराकरिता प्रतिगाळा 1600 चौरस फूट बांधकाम क्षेत्रफळ मंजूर करण्यात येणार आहे. तर अनिवासी वापराकरिता प्रतिगाळा 987 चौरस फूट इतके बांधकाम क्षेत्रफळ मंजूर करण्यात येईल, असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.
गृहनिर्माण विभागाने सरकारी निर्णय जारी करताच म्हाडाच्या मुंबई मंडळाने पुनर्विकासासासाठी टेंडर काढले. टेंडर प्रक्रियेमध्ये अदानी, एल अँड टी आणि श्री नमन ग्रुप या कंपन्यांनी टेंडर भरले होते. कंपन्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी केली असता त्यामध्ये श्री नमन ग्रुप या कंपनीचे टेंडर अपात्र ठरले आहे. पुनर्विकासाबाबत न्यायालयात सुनावणी सुरु असल्याने म्हाडा निविदा प्रक्रियेची माहिती न्यायालयात सादर करणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार म्हाडा पुनर्विकासाची प्रक्रिया पूर्ण करेल, असे म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर यांनी सांगितले.