मुंबई (Mumbai) : मुंबईतील मध्यवर्ती आणि ऐन मोक्याच्या ठिकाणी असलेल्या कामाठीपुरा (Kamathipura) येथील इमारतींच्या समूह पुनर्विकासासाठी गृहनिर्माण विभाग नवीन वर्षाच्या सुरुवातीला पुनर्विकासाची अधिसूचना जारी करणार आहे.
या प्रकल्पासाठी नोडल एजन्सी म्हणून म्हाडाची नियुक्ती करण्यात येणार आहे. खाजगी विकासकांमार्फत हा प्रकल्प मार्गी लावल्यानंतर म्हाडाला सोडतीसाठी अतिरिक्त घरे प्राप्त करणार आहेत.
कामाठीपुरा येथील सुमारे 40 एकर जमिनीवर वसलेल्या एक हजार इमारतींपैकी 700 इमारती आणि चाळी 100 वर्षे जुन्या असून अत्यंत धोकादायक अवस्थेत आहेत. किमान 50 ते 180 चौरस फुटांच्या छोट्याशा खोलीत येथील रहिवासी धोकादायक अवस्थेत राहत असल्याने हा पुनर्विकास एक आव्हानात्मक बाब ठरणार आहे. या इमारतींचा पुनर्विकास तातडीने मार्गी लावण्यासाठी गृहनिर्माण मंत्र्यांनी सैफी-बुर्हाणी अपलिफ्टमेन्ट ट्रस्टच्या (एसबीयूटी) धर्तीवर कामाठीपुरा समूह पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाला केली होती. त्यानुसार मंडळाने इमारतींच्या पुनर्विकासासाठी प्रस्ताव तयार केला आहे.
40 एकर जागेवरील आणि दाटीवाटीने उभारलेल्या इमारतीच्या पुनर्विकास म्हाडामार्फत करणे अशक्य असल्याने खासगी विकासकांच्या मदतीने हा प्रकल्प मार्गी लावण्यात येणार आहे. गोरेगाव मोतीलाल नगरच्या पुनर्विकासासाठी म्हाडाने ज्या पद्धतीने निविदा काढल्या. त्याच धर्तीवर कामाठीपुरा येथील इमारतींच्या समूह पुनर्विकासासाठी निविदा काढण्याचा विचार गृहनिर्माण विभागाचा आहे. हा प्रकल्प तातडीने मार्गी लागावा यासाठी नवीन वर्षात या प्रकल्पाच्या पुनर्विकासाची अधिसूचना काढण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.