Mumbai News मुंबई : मुंबईनंतर आता कोकण, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर मंडळातही ‘म्हाडा’च्या (MHADA Lottery) घरांचा धमाका असणार आहे.
मुंबईत सुमारे एक हजार ९०० घरांची सोडत काढण्याचे ‘म्हाडा’ने नियोजन सुरू असतानाच कोकण, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर मंडळातील सुमारे पाच हजार ६०० घरांच्या सोडतीसाठी जाहिरात काढली जाणार आहे.
सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या ‘म्हाडा’कडून दरवर्षी घरांची सोडत काढली जाते. ‘म्हाडा’ने कोकण मंडळातील सुमारे एक हजार ६००, पुणे मंडळातील अडीच हजार, तर छत्रपती संभाजीनगर मंडळातील दीड हजार घरांच्या विक्रीसाठी जाहिरात काढण्याची तयारी ‘म्हाडा’ने केली आहे. ही जाहिरात आठवडाभरात येणार असल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
सामान्यांना सहजपणे घर घेता यावे म्हणून कोकण, पुणे आणि छ.संभाजीनगर मंडळातील घरांच्या विक्रीसाठी लवकरच जाहिरात काढली जाणार आहे, असे ‘म्हाडा’चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे यांनी सांगितले.