मुंबई (Mumbai) : मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षित निवाऱ्याची सोय करण्यासाठी म्हाडामार्फत महत्त्वपूर्ण अशी वृद्धाश्रम योजना राबविण्यात येत आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात कांदिवली पश्चिमेला चारकोप परिसरात एक, तर पूर्व उपनगरात घाटकोपर येथे एक आणि अन्य एका ठिकाणी एक, असे तीन वृद्धाश्रम मुंबईत उभी करण्याची योजना म्हाडाने तयार केली आहे.
याआधी म्हाडाने कर्करोग रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी एक हजार घरे उपलब्ध केली आहेत. मुलामुलींसाठी, तसेच नोकरी करणाऱ्या तरुणी आणि महिलांसाठी वसतिगृह योजना तयार केली आहे. पशुवैद्यकीय रुग्णालय योजना पण तयार केली आहे. आता मुंबईत तीन वृद्धाश्रम बांधण्याच्या योजनेवर म्हाडा काम करत आहे.
वृद्धाश्रम योजना सध्या अभ्यासाच्या टप्प्यात आहे. वृद्धाश्रम किती मोठा बांधायचा, त्यात काय सोयी हव्या या सर्व बाबींचा विचार करून योजनेची रुपरेखा निश्चित केली जाईल. संपूर्ण प्रकल्पाचा अंदाज आला की खर्चाचे अंदाजपत्रक तयार करून औपचारिक प्रस्ताव मंजुरीसाठी म्हाडा तयार करणार आहे.
वृद्धाश्रम योजनेवर काम सुरू आहे. पण ही योजना प्राथमिक टप्प्यात असल्यामुळे या संदर्भात सविस्तर माहिती देणे म्हाडा टाळत आहे. वृद्धाश्रम योजनेवर अधिकारी आणि कर्मचारी काम करत आहेत या वृत्ताला म्हाडाकडून अधिकृत दुजोरा मिळाला आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडा ही संस्था महाराष्ट्रातील शासकीय संस्था आहे. म्हाडाची स्थापना ५ डिसेंबर १९७७ रोजी महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ, विदर्भ गृहनिर्माण मंडळ, झोपडपट्टी सुधार मंडळ व मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ यांना विलीन करून झाली. महाराष्ट्रातील शहरांमध्ये मध्यम व अल्प-उत्पन्न असलेल्या नागरिकांसाठी वाजवी दरात घरे बांधण्यासाठी म्हाडा कार्यरत आहे. म्हाडाने आतापर्यंत हजारो घरे बांधली आणि घर मालकांना हस्तांतरित केली आहेत. या व्यतिरिक्त जनहितासाठीही म्हाडा काही उपक्रम राबवत आहे. म्हाडाचा अभ्यासाच्या टप्प्यात असलेला वृद्धाश्रम प्रकल्प हा पण जनहितासाठीचा उपक्रम आहे.