मुंबई (Mumbai) : मुंबईत म्हाडाच्या घरांच्या सोडतीची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. दिवाळीत मुंबईमध्ये चार हजार घरांची लॉटरी काढण्यासाठी म्हाडाने तयारी सुरु केली आहे. पहाडी-गोरेगाव, अँटॉप हिल, विक्रोळी आणि कोळे-कल्याण या ठिकाणी ही घरे असणार आहेत. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल. म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी दिवाळीत मुंबईतील अंदाजे चार हजार घरांसाठी सोडत काढण्याची तयारी सुरु केल्याची माहिती दिली आहे.
गेल्या तीन वर्षांत म्हाडाने मुंबईतल्या घरांसाठी लॉटरी काढली नाही. त्यामुळे म्हाडाच्या घरांच्या सोडतीची मुंबईकरांची प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येणार आहे. पहाडी-गोरेगाव, अँटॉप हिल, विक्रोळी आणि कोळे-कल्याण या ठिकाणी ही घरे असतील. बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पातील घरांचा सोडतीत समावेश करू नये, असा निर्णय म्हाडाने घेतला होता. मात्र, आता चालू प्रकल्पातील येत्या सहा महिन्यांत किंवा वर्षभरात बांधकाम पूर्ण होऊन निवासी दाखला मिळू शकेल अशा घरांचा सोडतीत समावेश करण्यात येणार आहे.
दिवाळीत मुंबईमध्ये सुमारे चार हजार घरांची सोडत काढण्याचा निर्णय म्हाडा प्राधिकरणाने घेतला आहे. मुंबई मंडळाने सोडतीची तयारी सुरू केली असून लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. मुंबईतल्या घरांच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्यामुळे या शहरात हक्काचे घर घेण्याचे स्वप्न अनेकांना धूसर वाटते. पण म्हाडाच्या गृहप्रकल्प योजनेत सर्वसामान्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होऊ शकते. दिवाळीच्या दीड-दोन महिन्यांआधी जाहिरात प्रसिद्ध करून प्रत्यक्ष सोडत काढण्यात येईल. या सोडतीत पहाडी, गोरेगाव येथील तीन हजार 15 घरांपैकी अल्प आणि अत्यल्प गटातील दोन हजार 683 घरांचा समावेश असण्याची शक्यता आहे. तसेच कोळे-कल्याण, अॅन्टॉप हिल, विक्रोळी आदी ठिकाणच्या घरांचाही समावेश असणार आहे.