मुंबई (Mumbai) : झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरण (एसआरए) योजनेच्या माध्यमातून नवी मुंबईतही झोपडपट्टी पुर्नविकासाचा मार्ग प्रशस्त झाला आहे. ऐरोली मतदार संघातील चिंचपाडा येथे पहिला एसआरए प्रकल्प उभा राहणार आहे. मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने आजपासून (ता. २१) येथील झोपड्यांचा सर्व्हे सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.
नवी मुंबईमध्ये दिघा ते बेलापूर दरम्यान एमआयडीसी क्षेत्र आणि डोंगराच्या पायथ्याशी झोपड्या उभ्या राहिल्या आहेत. एसआरए योजनेतून नवी मुंबईतील झोपड्यांच्या पुर्नविकासासाठी शिवसेनेचे (शिंदे गट) नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील नवी मुंबईतील झोपडपट्टींचा ठाण्याच्या धर्तीवर पुनर्विकास करणार असल्याचे आश्वासन दिले होते.
अलीकडेच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात बैठक घेऊन झोपड्यांचे बायोमॅट्रिक सर्व्हे करण्याचे आदेश दिले आहेत. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरणाकडून ऐरोलीतील चिंचपाडा येथील झोपडपट्टी विभागात घरांचा सर्व्हे २१ सप्टेंबरपासून करण्यात येणार आहे. उपजिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी मुंबई महानगरप्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ठाणे-१ च्या अधिकारी वैशाली परदेशी-ठाकूर यांनी यासंदर्भात जाहीर सूचना प्रसिध्द केली आहे.
महाराष्ट्र शासन गृहनिर्माण विभागाकडील शासन निर्णय क्र.झोपुयो १००१/प्र.क्र १२५/१४/ झोपसू-१ दि.१६/५/२०१५ मध्ये नमूद झोपडी दि.१/१/२००० किंवा त्यापूर्वीपासूनची संरक्षण प्राप्त असल्याचे ठरविण्याबाबत घरांचा समावेश सर्व्हे आणि महाराष्ट्र शासन गृहनिर्माण विभाग शासन निर्णय क्र.झोपुयो-०८१०/प्र.क्र.९६/२०१८/झोपसु-१, दि.१६/५/२०१८ मध्ये शासन निर्देशात नमूद केल्यानुसार झोपडी १/१/२०११ रोजी किंवा त्यापूर्वीची असल्यास सशुल्क (अडीच लाखात घर) पुनर्वसनासाठी योग्यता ठरविणार्या झोपड्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. सर्वेक्षण पथकाकडून झोपडी क्रमांक देण्यात आलेल्या झोपड्यांचे मोजमाप, झोपडीधारकांच्या घरोघरी जाऊन संबंधित कुटुंबप्रमुखांचे बायोमेट्रिक टेक्नोलॉजीद्वारे अंगठ्याचा ठसा व फोटो व झोपडीसमोर झोपडीधारकांच्या कुटुंबाचे फोटो घेण्यात येणार आहेत. रहिवाशांकडून वास्तव्याचे पुरावे संकलित केले जाणार आहेत. हे सर्वेक्षण झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत केले जात असून त्याला सहकार्य करण्याचे आवाहन प्राधिकरणाने केले आहे.